नवी मुंबई : बारवी धरणातून नवी मुंबईकरांना मिळणे अपेक्षित असलेले ४० एमएलडी पाणी गेल्या सुमारे साडेपाच वर्षांपासून मिळालेले नाही, ते चोरले आहे. कोविड काळातही नवी मुंबईकरांच्या हक्काच्या ऑक्सिजन आणि औषधांची चोरी केली गेली. यास नगरविकास खाते जबाबदार आहे, असा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी वाशीत केला. नवी मुंबईकरांना हक्काचे पाणी मिळाले नाहीतर पालिका निवडणुकीत पाणीचोर, गॅसचोर, औषधचोर, भूखंडचोर अशी उपाधी लावून प्रचार करण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून दिला आहे.
प्रलंबित प्रश्न पालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी वाशीतील सिडको ऑडिटोरिअममध्ये आयाेजित बैठकीत नाईक यांनी नगरविकास खात्यावर टीका केली. यावेळी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी खा. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे आदी उपस्थित होते.
‘ती’ १४ गावे वगळणार१४ गावांचा समावेश नवी मुंबईत केल्याने पालिकेला सहा हजार कोटींचा भुर्दंड पडणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याने गावे वगळता येणार नाहीत; परंतु निवडणूक झाल्यावर ती वगळणार असल्याचे नाईक म्हणाले.
गणेश नाईक यांनी घेतलेल्या बैठकीबाबत बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या मतदारसंघात बैठक घेऊनही आमदार म्हणून मला काहीच माहीत नव्हते. चोर कोण आहे, ये सब जनता जानती है, असे म्हात्रे म्हणाल्या. यापुढे मतदारसंघात कोणी लुडबुड केली तर ते सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.