करंजा लॉजिस्टिकविरोधात मोर्चा
By Admin | Updated: March 21, 2017 02:05 IST2017-03-21T02:05:53+5:302017-03-21T02:05:53+5:30
करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक्स बंदराच्या विरोधात उरण तालुका भाजपाच्या वतीने सोमवारी प्रकल्पावरच विविध प्रलंबित

करंजा लॉजिस्टिकविरोधात मोर्चा
उरण : करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक्स बंदराच्या विरोधात उरण तालुका भाजपाच्या वतीने सोमवारी प्रकल्पावरच विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या संतप्त मोर्चेकऱ्यांनी प्रकल्पाचे कामकाज काही तास बंद पाडले. या मोर्चात स्थानिक मच्छीमारांसह सुमारे ४०० नागरिक सहभागी झाले होते.
करंजा टर्मिनल लॉजिस्टिक्सच्या बंदराचे काम सुरू आहे. मात्र या बंदर उभारणीच्या कामामुळे मच्छीमार व्यवसायावरच विपरीत परिणाम झाला आहे. स्थानिकांना रोजगारापासूनही वंचित ठेवले आहे. त्यामुळे करंजा परिसरातील ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. करंजा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी, स्थानिकांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, करंजा टर्मिनल लॉजिस्टिक्ससाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला उर्वरित शेतकऱ्यांना पूर्णपणे देण्यात यावा, आदी प्रलंबित मागण्यांसाठी उरण तालुका भाजपाच्या वतीने सोमवारी प्रकल्पावरच मोर्चा काढण्यात आला. कासवले- हनुमान मंदिर ते करंजा लॉजिस्टिक असा दीड किमी अंतरापर्यंत तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात चाणजे, राजिप सदस्या रीना घरत, पं. स. सदस्य दीपक चिवेलकर, चाणजे ग्रा. पं.चे माजी सरपंच जितेंद्र घरत, करंजा मच्छीमार संस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा आदींसह नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चेकऱ्यांनी प्रकल्पाचे कामकाज बंद पाडताच वठणीवर आलेल्या करंजा टर्मिनल लॉजिस्टिकच्या अधिकाऱ्यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाची भेट घेवून चर्चा केली. चर्चेत प्रकल्प अधिकारी नटराजन यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची ठोस पूर्तता न केल्यास प्रकल्पच बंद पाडण्याचा इशाराही भाजपाने प्रकल्प अधिकाऱ्यांना दिला. (वार्ताहर)