जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार; कोपरखैरणेतील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 10, 2023 17:34 IST2023-07-10T17:34:18+5:302023-07-10T17:34:35+5:30
जुन्या भांडणातून एकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे.

जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार; कोपरखैरणेतील घटना
नवी मुंबई : जुन्या भांडणातून एकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. यावेळी तरुणाने हातावर वार झेलल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यातील नेमका वाद समोर आलेला नाही.
कोपर खैरणे सेक्टर ४ येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणारा किरण वाशिवले (२८) हा रात्री ११ च्या सुमारास मित्रांसोबत उभा होता. यावेळी तिथे आलेल्या चौघांपैकी सचिन सपकाळ याने त्याच्याकडे जुन्या भांडणाचा विषय काढत त्या भांडणात तू होता का याबाबत चौकशी केली. यामध्ये त्यांच्यात वाद झाला असता सचिन त्याच्याकडील हेल्मेटने किरणला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर राकेश धारी याने सोबत आणलेल्या कोयत्याने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरवात करताच किरणने तिथून पळ काढला असता ते चौघेही त्याच्या मागे धावू लागले.
काही अंतरावर किरणचा भाऊ भेटला असता तो त्यांच्याकडे चौकशी करत असतानाच सचिनने किरनवर कोयत्याने हल्ला केला. त्यामध्ये बचावासाठी किरणने कोयता हाताने अडवला असता त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर चौघांनीही तिथून पळ काढला असता जखमी किरणला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी सोमवारी दुपारी कोपर खैरणे पोलिस ठाण्यात सचिन सपकाळ, नरेश सपकाळ, विशाल चिकणे व राकेश धारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणेत मंडळाच्या आडून मुलांच्या टोळ्या तयार होत आहेत. त्यातूनच किरकोळ कारणातून एकमेकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत.