बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:43 PM2018-10-31T23:43:03+5:302018-10-31T23:44:10+5:30

कर्जासाठी दिलेल्या झेरॉक्सचा वापर; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

Fraud with fake documents | बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने फसवणूक

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने फसवणूक

Next

पनवेल : एखाद्या व्यक्तीला आपण पॅन किंवा आधार कार्डची झेरॉक्स सहज देतो; परंतु काम झाले नाही तर त्या झेरॉक्स प्रती परत घ्यायला आपण विसरतो. अशा प्रकारचा विसरभोळपणा किंवा निष्काळजीपणाचा फटका नेरुळ येथील एका रहिवाशाला बसला आहे. त्याने कर्जासाठी दिलेल्या झेरॉक्स प्रतीचा वापर करून दोन गुन्हेगारांनी त्यांच्या नावावर दोन गाड्या व मोबइलसाठी कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ए. तांबोळी असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून, त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरुळ येथे राहणारे ए. तांबोळी यांना मोबाइल घेण्यासाठी कर्ज हवे होते. त्यांनी आपल्या भावाच्या ओळखीच्या असलेल्या प्रवीण खडकबाण यांच्याकडे मोबाइलच्या फायनान्ससाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दिल्या; परंतु सिबिल स्कोअर कमी असल्याने त्यांना कर्ज मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती परत न घेताच तांबोळी निघून गेले. या संधीचा फायदा घेत प्रवीण खडकबाण व सोमनाथ वाघमारे यानी तांबोळी यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रतीवर स्वत:चा फोटो लावून बनावट कागदपत्र तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या अधारे त्यांनी तांबोळी यांच्या नावावर दोन दुचाकी व ५७ हजार रुपयांचा मोबाइल घेतला. यातील एका दुचाकीचे आरसी बुक एन. तांबोळी यांच्या नेरुळ येथील घरच्या पत्त्यावर गेल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब पनवेल शहर पोलिसांमध्ये संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी प्रवीण खडकबाण आणि सोमनाथ वाघमारे या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Web Title: Fraud with fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.