वाहन परवान्यासाठी रांगेत चार तासांची ‘शिक्षा’
By Admin | Updated: March 20, 2017 02:17 IST2017-03-20T02:17:26+5:302017-03-20T02:17:26+5:30
वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ

वाहन परवान्यासाठी रांगेत चार तासांची ‘शिक्षा’
नवी मुंबई : वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. पैसे भरणे व छायाचित्र काढण्यासाठी तब्बल चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे. कार्यालयातील संगणक प्रणाली वारंवार बंद होत असून प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
नवी मुंबई आरटीओ कार्यालयाविषयी नागरिकांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एपीएमसीमधील भाडेतत्त्वाने घेतलेल्या गाळ्यामध्ये कार्यालय सुरू असून येथे येणाऱ्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. आरटीओ कर्मचारी नागरिकांना गुलामाप्रमाणे वागवत आहेत. शनिवारी वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अक्षरश: चार तास उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी पैसे भरून घेण्यासाठी दोन तास ताटकळत उभे रहावे लागले. पैसे भरून घेणारे कर्मचारी अत्यंत धीम्या गतीने काम करत होते. शिवाय नागरिक रांगेत उभे असताना अनेक एजंट व राजकीय वशिलेबाजी घेवून आलेल्या नागरिकांचे पैसे थेट आतमधून भरून घेतले जात होते. अनेक एजंट थेट आतमध्ये जावून पैसे भरून घेत होते. पैसे भरून झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी पुन्हा रांग लावावी लागली. वास्तविक पैसे भरल्यानंतर टोकन नंबर दिलेला असताना पुन्हा रांग लावण्याची गरजच नाही, पण टोकन नंबर फक्त नावालाच आहेत.
कार्यालयाच्या मधल्या पॅसेजमध्ये रांग लावावी लागते. तेथे उभे राहण्यासाठीही जागा नाही. कार्यालयातील कागदांच्या गोणी त्याच परिसरामध्ये अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या आहेत. नागरिकांना बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. तीव्र उकाड्यामुळे अनेकांना भोवळ येत असून नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी पावणेबारा वाजता रांग लावलेल्या नागरिकांना पैसे भरण्यासाठी व फोटो काढून घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजले. यामुळे वाहन चालकाच्या परवान्यासाठीची परीक्षा न देताच परत फिरावे लागले. एवढा उशीर का होत आहे याविषयी विचारणा केली असता कर्मचारी सर्व्हर खराब आहे. संगणक बरोबर नाही अशी उत्तरे देत होते.
अनेक वेळा नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. आरटीओ कार्यालयात नागरिकांना वाहन चालकाचा परवाना कसा मिळवायचा, कशी अपॉर्इंटमेंट घ्यायची याविषयी माहिती देण्याची काहीही यंत्रणा शिल्लक नाही. एजंटची मदत घेतल्याशिवाय येथील एकही काम होवू शकत नाही अशी स्थिती असून तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)