पनवेलला तलाव व्हिजनचा विसर

By Admin | Updated: March 13, 2016 03:44 IST2016-03-13T03:44:17+5:302016-03-13T03:44:17+5:30

पनवेलला तलावांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. या तलावांनी शहरवासीयांची अनेक वर्षे तहान भागविल्याची नोंद १८८१ मधील सरकारी कागदपत्रांमध्येही आढळते.

Forget about Lake Vision of Panvel | पनवेलला तलाव व्हिजनचा विसर

पनवेलला तलाव व्हिजनचा विसर

नामदेव मोरे, नवी मुंबई
पनवेलला तलावांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. या तलावांनी शहरवासीयांची अनेक वर्षे तहान भागविल्याची नोंद १८८१ मधील सरकारी कागदपत्रांमध्येही आढळते. जवळपास १३५ वर्षांची पार्श्वभूमी असणाऱ्या तलावांची सद्य:स्थितीमध्ये दुरवस्था झाली आहे. पालिकेलाही तलाव व्हिजनचा विसर पडला असून, शहराचे वैभव असणाऱ्या जलाशयांना कचराकुंड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पाण्याची कोणतीही योजना असली तरी त्यामध्ये वडाळे तलावाची सुधारणा करण्याची तरतूद असलीच पाहिजे. कारण सध्या पाणी हाच खरा साठा (संपत्ती) आहे. नदी व वडाळे तलाव यामध्ये फक्त एक मैलाचे अंतर आहे. त्या भागात पाइप टाकून पाणीपुरवठा करता येईल. हा मजकूर आहे १० नोव्हेंबर १८८४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी व नगरपालिकेचे अध्यक्ष यांच्याकडे दिलेल्या पत्रातील आहे. वडाळे व कृष्णाळे तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याचा उल्लेख १८८१ व ८२ च्या शासकीय अहवालामध्ये आढळतो. १८८४ व ८५ मध्ये तत्कालीन मामलेदारांनी खांदे येथील तलाव उकरून घेतला होता. यासाठी १०० घनफुटास आठ आणे दर दिला असल्याचा उल्लेख आहे. या दोन्हीही उल्लेखांवरून स्पष्ट होते, की १२५ वर्षांपूर्वी शहराचे नेतृत्व करणारे व प्रशासनाचा गाढा हाकणाऱ्यांनी तलावांची स्वच्छता राखण्यासाठी किती दक्षता घेतली होती? परंतु कालांतराने शहर वाढत राहिले. तलावांमधील पाण्याचा वापर पिण्यासाठी होईनासा झाला. कचरा, निर्माल्य टाकण्यासाठी या पाण्याचा वापर सुरू आहे. नगरपालिकेच्या मुख्यालयासमोर लेंडाळे तलाव आहे. तलावाची भिंत एक ठिकाणी कोसळली आहे. पाण्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच पडला आहे. पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. कचराकुंडीप्रमाणे या जलाशयाचा उपयोग होऊ लागला आहे. या तलावाचे योग्य पद्धतीने देखभाल व दुरुस्ती केली असती तर शहराच्या व या परिसराच्या सौंदर्यात भर पडली असती.
नगरपालिका मुख्यालयासमोरील तलावाची दुरवस्था झाली आहेच, त्याचपद्धतीने इतर तलावांची स्थितीही बिकट आहे. पर्यावरण अहवालाप्रमाणे येथील पाणी दूषित झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या वडाळे तलावाचे पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरले जात होते. त्या तलावाला जलपर्णींचा वेडा पडला आहे. तलाव आहे की पाणी साचलेले डबके, यामधील फरक कळेनासा झाला आहे. विश्राळे तलावाचा वापर कपडे धुण्यासाठी केला जात आहे. नगरपालिकेने तलाव व्हिजन राबवून या जलाशयांची डागडुजी करणे आवश्यक आहे. तलाव सुशोभित केला तर त्यामुळे त्या परिसराचेही महत्त्व वाढेल. शहरवासीयांना हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होऊ शकते. याशिवाय येथील पाण्याचा उद्यान, बांधकाम व इतर कारणांसाठी वापर करता येऊ शकतो. भविष्यात अतिक्रमण होऊन तलावांचे अस्तित्व संपण्यापूर्वीच पालिकेने तलाव व्हिजन राबविण्याची अपेक्षा दक्ष नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
ठोस धोरणाची आवश्यकता
तलाव हे पनवेल शहरास लाभलेले नैसर्गिक वरदान आहे. ठाणे व नवी मुंबईप्रमाणे तलाव व्हिजन राबवून त्यांचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. तलावांचे सुशोभीकरण केले तर शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पडू शकते. ठाणे शहरामध्ये तलाव हे विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. रोज सकाळ, सायंकाळी हजारो नागरिक तलाव परिसराला भेट देण्यासाठी येत असतात. पनवेल नगरपालिकेनेही याच धर्तीवर तलावांचे नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे. नगरपालिकेनेही याविषयी योजना तयार केली असून, लवकरच पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

Web Title: Forget about Lake Vision of Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.