Following the instructions, the school will start in Navi Mumbai | सूचनांचे पालन करीत नवी मुंबईत सुरू होणार शाळा 

सूचनांचे पालन करीत नवी मुंबईत सुरू होणार शाळा 

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.


कोरोना संकटामुळे या वर्षी प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू आहे. अनलॉकमध्ये विविध गोष्टींत शिथिलता देताना नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान, विद्यार्थ्यांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी गोष्टींचा वापर करणे बंधनकारक असून पालिकेच्या माध्यमातून शहरातील शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारणी आदी कामे केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर आदी सुविधा पुरविण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येणार आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  

शिक्षकांची होणार कोरोना चाचणी
शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, शाळेतील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी गुरुवारी नेरूळ येथील लॅबमध्ये  करण्यास सुरुवात झाली. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील खाजगी शाळांमधील शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीदेखील करून देण्यात येणार आहे.

एकूण पाच हजार ५०० विद्यार्थी 
नवी मुंबई पालिकेच्या २० माध्यमिक शाळांमध्ये या वर्षी नववी आणि दहावीच्या वर्गात सुमारे पाच हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक विभागाचे १३५ शिक्षक असून ६० शाळांमध्ये काम करीत आहेत. शासनाच्या सूचनांनुसार पालिकेने शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या शिक्षकांबरोबर शहरातील खाजगी शाळांच्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- संजय काकडे, 
अतिरिक्त आयुक्त, न.मुं.म.पा.

Web Title: Following the instructions, the school will start in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.