कर्जतमधील नद्या भरल्या गाळाने
By Admin | Updated: May 30, 2017 06:07 IST2017-05-30T06:07:13+5:302017-05-30T06:07:13+5:30
वाढती वृक्षतोड, अमर्याद वाळू उपसा, बेसुमार उत्खनन आणि अलीकडच्या काळात सिमेंट पिशव्यांमध्ये माती टाकून घातले जाणारे

कर्जतमधील नद्या भरल्या गाळाने
कांता हाबळे/लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : वाढती वृक्षतोड, अमर्याद वाळू उपसा, बेसुमार उत्खनन आणि अलीकडच्या काळात सिमेंट पिशव्यांमध्ये माती टाकून घातले जाणारे कच्चे बंधारे यामुळे कर्जत तालुक्यातील बहुतांशी नद्या, ओढे पाण्याऐवजी गाळानेच भरले आहेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली असून नदीपात्रातील वर्षानुवर्षाचे खोल डोह गाळाने भरून उथळ झाले आहेत. अमर्याद वाळू उपशामुळे गाळाचे नैसर्गिक फिल्ट्रेशन थांबल्याने गाळ थेट नदीपात्रात येत आहे. अनेक ठिकाणी गाळ साठून राहिला आहे. या वाढत्या गाळाने नदीपात्रात शेरणीसह अन्य झाडे वाढल्याने अनेक नदी-नाल्यांची पात्रे बदलली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नदी काठावरची क्षेत्र नद्यांनी गिळंकृत केले आहे. एकूणच गाळ हा नदीपात्राच्या मुळावर आला आहे.
नदी, नाले हे खरे नैसर्गिक जलस्रोत म्हणून ओळखले जातात. दुर्गम भागात उगम पावलेल्या या छोट्या-मोठ्या नद्यांचे पाणी समुद्राला मिळते. या नद्यांवर अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतात. गेल्या काही वर्षात या नद्यांना गाळाचे ग्रहण लागले आहे. हा गाळ काही आपसुकच आला नाही तर याला माणूसच कारणीभूत आहे. कर्जत तालुक्यात होत असलेला अमर्याद वाळू उपसा आणि वृक्षतोड यामुळे नदी-नाले गाळाने भरले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली आहे. गाळ थेट नदी, नाल्यांमध्ये येऊ लागला आहे. पूर्वी नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू असे. ही वाळू नैसर्गिकरीत्या गाळ फिल्ट्रेशनचे काम करत असते. त्यामुळे कमीत-कमी गाळ पुढे वाहत येत असते. बेसुमार उत्खनन देखील गाळाला कारणीभूत ठरत आहे.
गेल्या काही वर्षात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदी, नाल्यांवर मातीचे कच्चे बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यासाठी सिमेंटच्या गोणींमध्ये माती भरून त्याचा बांध घातला जातो. त्यामुळे या बंधाऱ्यांमुळे काहींप्रमाणात पाणीसाठा होत असतो. मात्र नंतर ही माती, सिमेंटच्या पिशव्या नदीपात्रात तशाच राहतात. पुराच्या पाण्याने ही माती, पिशव्या वाहून खोल डोहामध्ये जाऊन साठतात. तसेच अलीकडच्या काळात नदीपात्रात प्लॅस्टिकसह अन्य कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. जे प्लास्टिक मातीत विघटन होत नाही त्यामुळे नद्या दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या वाढत्या गाळामुळे वर्षानुवर्षाचे खोल डोह काही अपवाद वगळता गाळाने भरून उथळ झाले आहेत. पूर्वी खोल डोह असल्यामुळे नद्यांमध्ये उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत पाणी साठवून राहायचे. मात्र आता डिसेंबर संपला की, नदी-नाल्यांचे पात्र कोरडे पडतात. त्याचा परिणाम त्या त्या भागातील जलस्रोतावर झाला आहे. कर्जत तालुक्यात काही अपवाद वगळता अनेक नद्या- नाले गाळाने भरून गेल्या आहेत. या वाढत्या गाळामुळे नद्यांमध्ये झाडे-झुडपे वाढली आहेत.पूर्वी शेतकरी वर्ग नद्यांमधील शेरणी व झाडे-झुडपे तोडून काढत असत. मात्र आता तसे होताना दिसत नाही. त्यामुळे झाडे आणि गाळाने नदीपात्रातील दिशा बदलली आहे. काही नदीपात्रांनी तर काठावरची भातशेती गिळंकृत केली आहे. त्यामुळे शासनाने नदीपात्रातील गाळ व झाडे-झुडपे काढण्याची मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
पाणीटंचाईच्या निवारणासाठी कोट्यवधी रु पये खर्च करूनही पाणीटंचाईचे १०० टक्के निवारण होत नाही. उलट सरकारी नळ योजना जलस्रोतच आटल्याने कुचकामी ठरतात. त्यामुळे हे जलस्रोत बळकट करण्यासाठी सरकारला नदी- नाल्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेऊन नद्या पुनर्जीवित करण्याची गरज आहे. नद्या गाळमुक्त केल्या तरच खऱ्या अर्थाने जलस्रोत बळकट होतील.