नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज! २५ डिसेंबरपासून 'स्टार एअर'ची विमान सेवा सुरू, पाहा शहरांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:44 IST2025-12-17T19:44:45+5:302025-12-17T19:44:58+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला २५ तारखेपासून प्रारंभ होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज! २५ डिसेंबरपासून 'स्टार एअर'ची विमान सेवा सुरू, पाहा शहरांची यादी
Navi Mumbai Airport: बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून आता प्रवासी विमाने उड्डाण घेणार आहेत. एअरलाईन स्टार एअरने या नवीन ग्रीनफील्ड विमानतळावरून आपल्या सेवा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या २५ डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर या विमानतळावर पहिले प्रवासी विमान लँड होणार असून, नवी मुंबईकरांसाठी हा मोठा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
महत्त्वाची शहरांशी जोडले जाणार
स्टार एअरने दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून पश्चिम आणि दक्षिण भारतातील प्रमुख व्यापारी व पर्यटन केंद्रांसाठी उड्डाणे सुरू होतील. यामध्ये प्रामुख्याने अहमदाबाद, गोवा (मोपा विमानतळ), बंगळुरू, नांदेड या शहरांचा समावेश आहे.
असे असेल विमानांचे वेळापत्रक
प्रवाशांच्या सोयीसाठी स्टार एअरने आपला नवीन शेड्यूल जाहीर केले आहे. यामध्ये थेट आणि कनेक्टिंग अशा दोन्ही सेवांचा समावेश आहे. नवी मुंबई - अहमदाबाद (थेट सेवा), नवी मुंबई - गोवा (मोपा) (थेट सेवा), नवी मुंबई - नांदेड (अहमदाबादमार्गे), नवी मुंबई - बंगळुरू (गोव्यामार्गे) अशी ही विमानसेवा असणार आहे.
जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव
या सर्व मार्गांवर स्टार एअर आपले अत्याधुनिक 'एम्ब्रेयर १७५' हे विमान वापरणार आहे. हे विमान आपल्या आरामदायी आसनव्यवस्थेसाठी आणि वेगवान प्रवासासाठी ओळखले जाते. नवी मुंबई आणि दक्षिण-पश्चिम भारतातील शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे व्यवसाय आणि पर्यटनाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल
सध्या विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांबाबत सुरू असलेल्या तांत्रिक समस्या आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, स्टार एअरने उचललेले हे पाऊल प्रवाशांसाठी मोठा दिलासा मानले जात आहे. नवीन विमानतळ आणि नवीन विमान सेवेमुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होण्यास मदत होईल.