जेएनपीटीमधील सीमा शुल्क विभागाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग; केमिकल लॅब जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 18:48 IST2020-05-26T18:47:46+5:302020-05-26T18:48:13+5:30
आगीत सुदैवाने जिवितहानी नाही

जेएनपीटीमधील सीमा शुल्क विभागाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग; केमिकल लॅब जळून खाक
- मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीटी येथील पीयुबी समोरच असलेल्या न्हावा- शेवा कस्टम हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील केमिकल लॅबला मंगळवारी (२६) दुपारी आग लागली. जेएनपीटीच्या अग्निशामक दलाच्या पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.पंचनाम्यानंतरच आर्थिक नुकसानीचा आकडा समजुन येईल अशी माहिती एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी दिली.
जेएनपीटी येथील कस्टम हाऊस इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लॅबोरेटरीला मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. न्हावा- शेवा बंदर पोलीस ठाण्याला याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जेएनपीटीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे केमिकल लॅबोरेटरीला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज न्हावा- शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी माहिती देताना व्यक्त केला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच पंचनाम्याचे काम पोलीस अधिकारी करत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानीची माहिती पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कळणार असल्याचेही दामगुडे यांनी सांगितले.