पनवेलच्या मिर्ची गल्लीत घराला आग; अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 00:27 IST2022-03-12T00:26:56+5:302022-03-12T00:27:11+5:30
सकाळची वेळ नसल्यानं अनर्थ टळला; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

पनवेलच्या मिर्ची गल्लीत घराला आग; अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
पनवेल: पनवेल शहरातील एमजी रोड वरील मिर्ची गल्ली याठिकाणी एका घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी 11.40 च्या सुमारास घडली. या घराच्या खाली गाळ्यामधे थर्माकॉल तसेच लग्न सराईत लागणाऱ्या साहित्याची विक्री केली जात असल्याने आगीने त्वरित पेट घेतला. त्यामुळे थोड्याच वेळात आगडोंब उसळू लागले.
घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिर्ची गल्ली वर्दळीचे ठिकाण
शहरातील मिर्ची गल्ली हे वर्दळीचे ठिकाण आहे. याच परिसरातील शहरातील सराफा बाजारदेखील आहे. दिवसा याठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. सुदैवाने आग रात्री लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली नाही.