चिप्स कंपनीत लागली आग; खैरणे एमआयडीसी मधील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 16, 2023 17:28 IST2023-05-16T17:28:10+5:302023-05-16T17:28:32+5:30
खैरणे एमआयडीसी मधील चिप्स कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

चिप्स कंपनीत लागली आग; खैरणे एमआयडीसी मधील घटना
नवी मुंबई : खैरणे एमआयडीसी मधील चिप्स कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे तिथल्या उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोटास असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. कंपनीच्या पहिल्या मजल्यावर सकाळी ९.१५ च्या सुमारास आग लागली. काही क्षणातच आग सर्वत्र पसरल्याने कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. तर छोट्या मोठ्या स्फोटाचे आवाज देखील होत होते. त्यामुळे परिसरातील इतर कंपन्यांमधील कामगारांमध्ये भीती पसरली होती. आगीची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिस व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र कंपनीतल्या उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. तर आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.