अखेर १३ कर्मचारी बडतर्फ

By Admin | Updated: June 24, 2016 03:50 IST2016-06-24T03:50:38+5:302016-06-24T03:50:38+5:30

महानगरपालिका परिवहन उपक्रमातील १३ कायमस्वरूपी सेवेतील चालक व वाहकांना बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी २१२ कंत्राटी कामगारांनाही सेवेतून काढून टाकले

Finally, 13 staffers | अखेर १३ कर्मचारी बडतर्फ

अखेर १३ कर्मचारी बडतर्फ

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमातील १३ कायमस्वरूपी सेवेतील चालक व वाहकांना बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी २१२ कंत्राटी कामगारांनाही सेवेतून काढून टाकले असून १४ पर्यवेक्षकांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेमधील बेशिस्तपणा मोडीत काढण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक बेशिस्तपणा परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांमध्ये निदर्शनास आला होता. अनेक चालक व वाहक एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुटीवर जात असल्याचे निदर्शनास आले होते. कायम कर्मचारीही वारंवार सुट्यांवर जात होते. आयुक्तांनी एनएमएमटीचा आढावा घेवून बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
रोजंदारीवरील २१२ चालक व वाहकांना सेवेतून कमी केले आहे. कायमस्वरूपी सेवेत असलेल्या २५ चालक व वाहकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये वाहक सुनील माने, संजय गावडे, कुमार पवार, सुभाष शिंगे, पांडुरंग पारधी, दिलीप खुरकुटे, बापू गावित, शरद पारधी, विष्णू पालवे, यांच्यासह बसचालक अर्जुन मसुगडे, रामचंद्र म्हसकर, अनंता जाधव व सुधीर पवार यांचा समावेश आहे.
उपक्रमातील १४ पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची जलदगतीने चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे उपक्रमाच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. परिवहन उपक्रमाविषयी प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जात आहे. ऐरोली, डोंबिवली, व कल्याण परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा व आरटीओच्या मदतीने कारवाई सुरू केली असून यामुळे उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होवू लागली आहे.

Web Title: Finally, 13 staffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.