सिडकोच्या घरांसाठी भरा अर्ज, संगणकीय सोडत होणार ३ फेब्रुवारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 08:28 IST2022-12-23T08:28:01+5:302022-12-23T08:28:14+5:30
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सिडकोच्या घरांसाठी भरा अर्ज, संगणकीय सोडत होणार ३ फेब्रुवारीला
नवी मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या मेगागृह योजनेतील घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गुरुवारची अंतिम मुदत होती. मात्र, अधिकाधिक नागरिकांना या याेजनेअंतर्गत घरासाठी अर्ज करता यावेत, यादृष्टीने अर्ज भरण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पूर्वी जाहीर केलेली संगणकीय सोडतही पुढे ढकलली असून आता ती ३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सिडकोने कळविले आहे.
सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उलवे नोडमधील ७,८४९ घरांची योजना जाहीर केली होती. बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वेस्थानकांच्या परिसरात ही घरे आहेत. या घरांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करता यावी, यादृष्टीने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
७ जानेवारीपर्यंत आता मुदत
आता ७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन शुल्क भरणा ७ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारूप यादी १४ जानेवारी रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ जानेवारीला सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या योजनेची संगणकीय सोडत ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अगोदर ही सोडत १९ जानेवारीला नियोजित केली होती.