नवी मुंबई : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘फिफा’ फुटबॉल सामन्यांच्या अनुषंघाने पोलिसांनी शहरात सुरक्षेचे जाळे तयार केले आहे. खेळाडू व प्रेक्षक यांच्यासाठी मल्टिलेअर सुरक्षा तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण सामने होईपर्यंत शहरातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर १७ वर्षांखालील ‘फिफा’ वर्ल्ड कप २०१७चे आठ सामने खेळले जाणार आहेत. ६, ९, १२, १८ व २५ आॅक्टोबरला हे सामने होणार आहेत. देशात प्रथमच होत असलेल्या या आंतरराष्टÑीय सामन्यांचा मान नवी मुंबईला मिळाला आहे. यानुसार ‘फिफा’करिता महापालिकेसह पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. यादरम्यान सुरक्षेत कसलीही कमतरता राहणार नाही, याची पुरेपूर खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता स्टेडिअमच्या आवारात मल्टिलेअर सुरक्षा उभारण्यात आली आहे. यानुसार स्टेडिअममध्ये प्रवेश करणाºया प्रेक्षकांना पोलिसांच्या एकापेक्षा जास्त तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. ‘फिफा’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत शहरातील प्रत्येक संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. विशेष शाखा उपआयुक्त राजेश बनसोडे, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, राजेंद्र माने यांच्याकडून प्रत्येक महत्त्वाच्या बाबीवर लक्ष ठेवले जात आहे.केंद्र व राज्य शासनाच्या ‘फिफा’च्या नियोजनावर लक्ष लागलेले असल्यामुळे पोलिसांकडून सुरक्षेला तितकेच महत्त्व देण्यात आलेले आहे. ‘फिफा’च्या माध्यमातून शहराची व राज्याची, तसेच देशाची प्रतिमा जगभर पोहोचणार आहे. यामुळे अंतिम सामना होईपर्यंत शहरात महिनाभर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून संशयास्पद वाहनांची तसेच व्यक्तींची झाडाझडती केली जाणार आहे. यादरम्यान नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथकामार्फत संपूर्ण स्टेडिअम परिसराची सतत पाहणी केली जात आहे. तर हजारहून अधिक पोलीस शहरात बंदोबस्तावर नेमले असून, त्यापैकी बहुतांश कर्मचारी साध्या वेशात कार्यरत राहणार आहेत. त्यानुसार अनपेक्षितपणे उद्भवलेल्या गैरप्रसंगाला तोंड देण्यास पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी व्यक्त केला आहे. तर एखादी संशयास्पद व्यक्ती निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन पठारे यांनी केले आहे.
‘फिफा’साठी पोलिसांची ‘मल्टिलेअर’ सुरक्षा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:08 IST