पार्किंगच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला; सीवूड येथील घटना, गाडी आडवी लावल्याच्या कारणाने वाद
By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 14, 2023 18:50 IST2023-09-14T18:49:07+5:302023-09-14T18:50:05+5:30
गाडी काढण्याला अडथळा होईल अशी गाडी लावल्याचा जाब विचारल्याने तिघांनी मिळून एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सीवूडमध्ये घडली.

पार्किंगच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला; सीवूड येथील घटना, गाडी आडवी लावल्याच्या कारणाने वाद
नवी मुंबई: गाडी काढण्याला अडथळा होईल अशी गाडी लावल्याचा जाब विचारल्याने तिघांनी मिळून एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सीवूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उलवे येथे राहणाऱ्या जितेंद्र वाकळे यांच्यासोबत बुधवारी रात्री सीवूडमध्ये हा प्रकार घडला आहे. गायमुख चौकालगत रस्त्याच्या कडेला ते गाडी उभी करून हॉटेलमध्ये गेले होते. काही वेळाने ते परत आले असता, त्यांच्या गाडीच्या मागे दुसरी गाडी (एमएच ४३ बिएन ४०२३) उभी असल्याने गाडी काढण्यास अडथळा झाला होता.
सुमारे एक तासाने गाडी चालक त्याठिकाणी आला असता जितेंद्र यांनी त्याला गाडी अशी कशी लावली ? असा प्रश्न केला. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु असतानाच तिथे आलेल्या गाडीचालकाच्या दोघा मित्रांनी जितेंद्र यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यापैकी एकाने जड वस्तू डोक्यात मारल्याने ते रक्तबंबाळ झाले. यानंतर त्यांनी पोलिसांच्या कंट्रोल रूमवर फोन करताच त्यांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर जितेंद्र यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एनआरआय पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.