किरकोळ कारणावरून कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 01:52 AM2020-01-26T01:52:23+5:302020-01-26T01:52:37+5:30

किरण पाटील (४५) असे हल्ला करून पळ काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Fatal attack on family members for minor reasons | किरकोळ कारणावरून कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला

Next

नवी मुंबई : किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करून पळ काढल्याचा प्रकार घणसोली गावात घडला आहे. यामध्ये सहा जण जखमी झाले असून, त्यात त्याच्या दिव्यांग मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
किरण पाटील (४५) असे हल्ला करून पळ काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा घणसोली गावातील चौकालगत पानटपरीचा व्यवसाय असून, काही अंतरावरच वडिलोपार्जित दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भावाने काही दिवसांपूर्वी घराच्या दुरुस्तीचे काम केले होते. त्याचे सामान अनेक दिवस खाली पडून असल्याच्या कारणावरून किरण याचा वाद झाला होता. या प्रकरणापासून त्यांच्यात सतत किरकोळ वाद सुरूच होते. तर त्याच्या भांडखोर स्वभावामुळे पत्नी व मुलगीही वेगळे राहत आहेत. शनिवारी दुपारी सर्व जण एकाच ठिकाणी असताना किरण हा त्या ठिकाणी आला. या वेळी त्याने पुन्हा भांडण काढले असता, सोबत आणलेल्या चाकूने त्याने घरातील सदस्यांवर वार केले. तर स्वत:च्या दिव्यांग मुलीलाही लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या वेळी तिथे आलेल्या एका भाडोत्रीवरही त्याने वार करून पळ काढला. त्याच्या या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये भाऊ शंकर पाटील, वहिनी अलका पाटील, पत्नी रेखा पाटील व भावाची मुलगी शिवांगी पाटील यांचा समावेश आहे. तर किरण याच्या दिव्यांग मुलीलाही दुखापत झाली आहे.
या प्रकरणी किरण पाटील याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवरकर यांनी सांगितले. तर कौटुंबिक वादातूनच त्याने हा हल्ला केल्याचेही प्राथमिक तपासात समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलीस किरण पाटील याचा शोध घेत आहेत.

Web Title: Fatal attack on family members for minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.