घरांचे हप्ते भरण्यासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:23 IST2020-09-29T23:23:28+5:302020-09-29T23:23:44+5:30
सिडकोचा निर्णय : १४,८३८ सदनिकाधारकांना मिळणार दिलासा

घरांचे हप्ते भरण्यासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई : सिडकोच्या २०१८ मधील गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १४,८३८ सदनिकाधारकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. कोरोनामुळे बहुतांश नागरिकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. अनेकांचे उत्पन्न कमी झाले आहे. जीवन जगताना तारेवरची कसरत करावी लागत असून, घरांचे हप्ते भरण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सिडकोने सदनिका खरेदीदारांसाठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. २ आॅक्टोबर, २०१८ मध्ये संगणकीय सोडत पार पडली होती. यामधील अनेक लाभार्थ्यांना कोरोनामुळे हप्ते भरणे शक्य होत नाही. यामुळे ३० जून व त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर, पुन्हा २८ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
च्नव्याने जाहीर केलेल्या मुदतवाढीच्या निर्णयानुसार ज्या अर्जदारांनी वाटपपत्रात नमूद एक ते चार हप्त्यांपैकी कोणत्याही हप्त्याची रक्कम भरली असेल, अशा अर्जदारांना आणखी तीन महिने म्हणजेच एकूण ९ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च ते डिसेंबरपर्यंतचे विलंबशुल्कही माफ करण्यात आले आहे.