कोकण रेल्वेच्या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार

By कमलाकर कांबळे | Updated: March 25, 2024 20:52 IST2024-03-25T20:52:35+5:302024-03-25T20:52:54+5:30

Konkan Railway News: विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर - मडगाव जंक्शन नागपूर या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

Extension of Konkan Railway's bi-weekly special trains till June | कोकण रेल्वेच्या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार

कोकण रेल्वेच्या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार

- कमलाकर कांबळे
 नवी मुंबई - विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर - मडगाव जंक्शन नागपूर या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३१ मार्चपर्यंत निर्धारित करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने या सेवेचा ९ जूनपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जातात. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत विविध मार्गांवर अतिरिक्त गाड्या चालविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून होळीसाठी विशेष बाब म्हणून नागपूर - मडगाव जंक्शन (०११३९) आणि मडगाव जंक्शन - नागपूर (०११४०) या द्वि - साप्ताहिक गाड्या चालविल्या जात आहेत. ३१ मार्चपर्यंत या गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने जाहीर केला होता. परंतु, आता त्या ९ जूनपर्यंत चालविल्या जाणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर - मडगाव जंक्शन ही गाडी ३ एप्रिल ते ८ जून या दरम्यान आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच बुधवार आणि शनिवारी धावणार आहे. तर मडगाव जंक्शन - नागपूर ही विशेष गाडी ४ एप्रिल ते ९ जून या कालावधीत पावसाचे दिवसवगळता प्रत्येक गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

पावसाळ्यातही विशेष गाड्या
जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे या काळातसुध्दा नागपूर - मडगाव जं. - नागपूर मार्गावर द्वि - साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या गाड्या १२ जून ते ३० जून यादरम्यान धावणार आहेत. नागपूर - मडगाव जंक्शन (०११३९) ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी नागपूर येथून बुधवार आणि शनिवारी दुपारी ३:५ मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सांयकाळी ५:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहचेल. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन - नागपूर ( ०११४०) ही द्वि - साप्ताहिक गाडी १३ ते ३० जून या कालावधीत गुरुवार आणि रविवारी सांयकाळी ७:०० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९:३० वाजता नागपूरला पोहचेल. ही गाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जंक्शन, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

Web Title: Extension of Konkan Railway's bi-weekly special trains till June