घरांच्या अर्जांसाठी सिडकोची मुदतवाढ? १,०६,००० ग्राहकांची ऑनलाइन नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 06:44 IST2024-12-10T06:44:10+5:302024-12-10T06:44:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत ११ डिसेंबर रोजी संपत आहे. आतापर्यंत ...

घरांच्या अर्जांसाठी सिडकोची मुदतवाढ? १,०६,००० ग्राहकांची ऑनलाइन नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत ११ डिसेंबर रोजी संपत आहे. आतापर्यंत १ लाख ५ हजार ९४२ ग्राहकांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. अर्ज नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक आहेत. विशेष म्हणजे सिडकोने घरांच्या किमतीही जाहीर केलेल्या नाहीत त्यामुळे अनेक ग्राहक संभ्रमात आहेत. ही बाब लक्षात घेऊन अर्ज नोंदणीसाठी सिडकोकडून आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे.
सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी मिळाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती. परंतु, दिवाळी आणि त्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीमुळे अनेकांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता आली नाही. त्यामुळे सिडकोच्या संबंधित विभागाने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदत बुधवारी संपत आहे.
घरांच्या किमती जाहीर न केल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. त्यामुळे अनेकांनी इच्छा असूनही ऑनलाइन अर्ज केलेला नाही. परिणामी अर्ज नोंदणीचा अपेक्षित आकडा सिडकोला गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर या गृहयोजनेतील घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी सिडकोकडून पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता संबंधित विभागातील सूत्राने व्यक्त केली आहे.
केवळ ३७,३९४ अर्जदारांनी भरले शुल्क
विविध नोडमधील २६ हजार घरांची योजना सिडकोने जाहीर केली आहे. या योजनेतील घरांसाठी जवळपास दोन लाख अर्ज येतील, अशी सिडकोच्या संबंधित विभागाची अपेक्षा होती.
प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन महिन्यात १ लाख ६ हजार ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी फक्त ३७,३९४ ग्राहकांनी संबंधित प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले शुल्क अदा केले आहे.