करंजा-रेवस मार्गावरील जलप्रवास महागला, प्रवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:12 IST2017-08-28T04:14:50+5:302017-08-28T05:12:13+5:30
देशातील जलमार्गांचा झपाट्याने विकास करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात जलप्रवासाचे जाळे जोडण्याचा सरकारने संकल्प केला आहे.

करंजा-रेवस मार्गावरील जलप्रवास महागला, प्रवासी संतप्त
आविष्कार देसाई
अलिबाग : देशातील जलमार्गांचा झपाट्याने विकास करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात जलप्रवासाचे जाळे जोडण्याचा सरकारने संकल्प केला आहे. प्रवासाच्या इतर साधनांच्या तुलनेत जलप्रवास किफायतशीर असतो; परंतु करंजा (उरण)-रेवस (अलिबाग) जलप्रवासाच्या तिकिटामध्ये वाढ करण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. अन्यायकारक केलेली दरवाढ रद्द करण्याची मागणी आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशने केली आहे.
परिवहन व बंदर विभागाचे प्रधान सचिव मनोज सैनिक यांना याबाबतचे निवेदन आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिले.
अलिबाग हे मुंबईच्या जवळचे शहर आहे. अलिबाग तालुक्यामध्ये दळण-वळणाच्या पुरेशा सुविधा अद्यापही मूर्तरूप घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध असलेला रस्त्यांवरील प्रवास हा खर्चिक आणि वेळ खाणारा आहे. अलिबाग तालुक्यातून मोठ्या संख्येने चाकरमानी, तसेच व्यापारी मुंबईमध्ये विविध कारणांनी प्रवास करतात. यामध्ये दिवसागणिक वाढच होत असल्याचे दिसून येते. चाकरमानी आणि व्यापारी जलप्रवासाला सर्वाधिक पसंती देतात. अलिबागमध्ये अलिबाग (मांडवा)-मुंबई (गेटवे आॅफ इंडिया) आणि अलिबाग (रेवस)-मुंबई (भाऊचा धक्का) आणि उरण तालुक्यातील करंजा-रेवस ही जलप्रवासाचे प्रमुख मार्ग आहेत. मांडवा-मुंबई हा जलप्रवास गेल्या काही वर्षांपासून महागडा ठरत आहे. त्यामुळे चाकरमानी विशेष करून छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाले रेवस-करंजा या जलप्रवासाला पसंती देताना दिसून येतात.
करंजामधून मुंबईमध्ये कमीत कमी खर्चात जाता येत असल्याने या मार्गाला जास्त प्रसंती आहे. दरवर्षी येथून सुमारे चार लाख प्रवासी प्रवास करतात. व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक यांची वार्षिक उलाढाल ही करोडो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या बंदराचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व वाढत असल्याचे दिसून येते.
करंजा-रेवस जलप्रवासाचे तिकिटांचे दर तब्बल २० रु पये करण्यात आले आहे. फक्त सव्वा किलोमीटरच्या प्रवासासाठी २० रुपये आकारणे, अन्यायकारक आहे. याआधी १३ रु पये तिकिटांचे दर होते. तेही अधिकच होते. त्यातच आता थेट २० रु पये वाढ करून त्यांनी प्रवाशांच्या खिशाला चांगलीच चाट दिली आहे. प्रवाशांवर लादलेली ही अन्यायकारक दरवाढ तातडीने रद्द झाली पाहिजे, अशी मागणी आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्राकांत मोकल यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
रेवस-मुंबई जलवाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे करंजा-रेवस, मोरा-मुंबई येथील जलप्रवासावर चांगलाच ताण पडत असल्याचे मोकल यांनी स्पष्ट केले. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले असतानाही तिकिटांच्या दरामध्ये वाढ का करण्यात आली? असा सवालही त्यांनी केला. अन्यायकारक केलेली दरवाढ तातडीन रद्द करण्यात यावी. ही मागणी आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने परिवहन व बंदर विभागाचे प्रधान सचिव मनोज सैनिक यांच्याकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.