उरणच्या मोरा बंदराचा वनवास संपणार, जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी १९.२२ कोटींचा निधी
By नारायण जाधव | Updated: October 11, 2023 17:36 IST2023-10-11T17:35:41+5:302023-10-11T17:36:27+5:30
मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान ९ किलोमीटरचा जलमार्ग आहे.

उरणच्या मोरा बंदराचा वनवास संपणार, जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी १९.२२ कोटींचा निधी
नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबईसह अलिबाग जलप्रवासासाठी महत्त्वाचे बंदर म्हणून उरण नजीकचे मोरा बंदर ओळखले जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथील जेट्टीची दुरवस्था झाली आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह विभागाने उशिराने का हाईना या जेट्टीचे मजबुतीकरण आणि इतर कामांसाठी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी १९ कोटी २२ लाख ६५ हजार ८७ रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. यामुळे या जेट्टीचा वनवास लवकरच संपणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान ९ किलोमीटरचा जलमार्ग आहे. या जलमार्गावरून प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मोरा जेट्टी बांधली आहे. मात्र, सध्या तिची दुरवस्था झाली असून समुद्रात असलेल्या या जेट्टीच्या मार्गावरील ये-जा करण्यासाठी असलेले संरक्षक लोखंडी पाइप, असलेले कठडे तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बंदरावर जात असताना येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय रात्रीच्या वेळी जेट्टीवरील विजेची सोय विस्कळीत असल्याने बहुतांश वेळा दिव्याखाली अंधार असतो.
बांधकामासाठी सीआरझेडची परवानगी लागणार
या जेट्टीवर मासळी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे दुरुस्तीचे कामदेखील सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होतो. तसेच बंदर विभागाने या ठिकाणी वाहनांना बंदी घातली असूनदेखील जेट्टीवरच दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने हे बंदर अनेक असुविधांनी ग्रासलेले आहे. यामुळे तिच्या दुरुस्तीची मागणी प्रवाशांसह मच्छीमारांकडून होत होती. अखेर शासनाने ही मागणी लक्षात घेऊन हा निधी मंजूर केला आहे. आता सीआरझेडची परवानगी घेऊन आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून जेट्टीचे मजबुतीकरण करावे लागणार आहे.
१९३४ साली बांधली जेट्टी
मोराची प्रवासी जेट्टी ही साधारणपणे १९३४ मध्ये बांधलेली आहे. मात्र, गेल्या ८९ वर्षांत देखभाल दुरुस्ती अभावी आणि समुद्राच्या खाऱ्या वार्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे. या जेट्टीची लांबी ४५ मीटर आणि रुंदी ५ मीटर इतकी आहे. तिचा वापर प्रवासी आणि मच्छीमार करतात. या बंदरातून मुंबई ते मोरा दरम्यान दिवसाला एक ते दीड हजार प्रवासी प्रवास करतात.