नवी मुंबईत अभियांत्रिकी परीक्षेचा घोटाळा
By Admin | Updated: May 24, 2017 01:48 IST2017-05-24T01:48:48+5:302017-05-24T01:48:48+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू झाल्या असून सोमवारी इलेक्ट्रिकल विभागाच्या परीक्षेत चक्क

नवी मुंबईत अभियांत्रिकी परीक्षेचा घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू झाल्या असून सोमवारी इलेक्ट्रिकल विभागाच्या परीक्षेत चक्क प्रश्नपत्रिकांची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई विद्यापीठातंर्गत आयोजित परीक्षेमध्ये खारघरमधील महाविद्यालयात प्रश्नपत्रिकेची अदलाबदल झाल्याचा आरोप इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. संपूर्ण नवी मुंबईतील इलेक्ट्रिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल मेकॅनिक्सची प्रश्नपत्रिका व खारघरमधील ए.सी.पाटील येथील विद्यार्थ्यांना दिलेली प्रश्नपत्रिका यामध्ये कसलेच साम्य नव्हते.
इलेक्ट्रिकल या शाखेत महाविद्यालयाचे नाव प्रसिध्द असल्याने ते टिकवून ठेवण्याकरिता या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोपी प्रश्नपत्रिका देण्यात आली होती असाही आरोप इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात खारघरच्या ए.सी. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतली असता चुकून दुसरी प्रश्नपत्रिका दिल्याचे सांगितले. विद्यापीठातंर्गत असलेल्या या परीक्षेत असा हलगर्जीपणा कसा केला जातो असा सवाल नवी मुंबईचे महाविद्यालयीन प्रभारी विनायक पिसाळ यांनी उपस्थित केला. परीक्षा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून तेव्हा विलंब झाला होता, मात्र आता यावर उपाय केला जाईल. याकरिता बुधवारी हे विद्यार्थी न्याय मिळविण्याकरिता शिक्षणमंत्र्यांची भेटणार असल्याचे पिसाळ यांनी स्पष्ट केले. प्रश्नपत्रिका बदलून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रकार अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून केला जात असून याला चाप बसावा, अशी मागणी इलेक्ट्रिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रकरणी रीतसर कारवाई करून या शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अथवा आंदोलन करण्याचा इशाराही विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची मनमानी थांबविली नाही तर यापुढे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येईल अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.