ट्री बेल्टवर अतिक्रमण

By Admin | Updated: April 25, 2016 03:11 IST2016-04-25T03:11:33+5:302016-04-25T03:11:33+5:30

जुहूगावच्या खाडी किनाऱ्यावरील ट्री बेल्टसाठी आरक्षित असलेली जागा हडप करण्याचे जोरदार प्रयत्न काही भूमाफियांकडून सुरू आहेत. काहींनी जागेला कुंपण घालून त्याचा खासगी वापर चालविला आहे

Encroachment on the tree belt | ट्री बेल्टवर अतिक्रमण

ट्री बेल्टवर अतिक्रमण

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
जुहूगावच्या खाडी किनाऱ्यावरील ट्री बेल्टसाठी आरक्षित असलेली जागा हडप करण्याचे जोरदार प्रयत्न काही भूमाफियांकडून सुरू आहेत. काहींनी जागेला कुंपण घालून त्याचा खासगी वापर चालविला आहे, तर काहींनी चायनिज धाबे व इतर व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिल्याचे दिसून आले आहे.
जुहूगावात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. मोकळ्या जागा बळकावून त्यावर इमले उभारण्याची येथे स्पर्धाच सुरू आहे. गावातील मोकळ्या जागा आता संपुष्टात आल्याने भूमाफियांनी शेजारच्या खाडी किनाऱ्यालगत असलेल्या ट्री बेल्टकडे आपला मोर्चा वळविला आहे. सिडकोने जुहूगाव परिसरात खाडी किनाऱ्याला लागून सेक्टर १0 येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वसाहतीपासून सेक्टर १२ येथील ओरिएंटल कॉलेजपर्यंतचा पट्टा ट्री बेल्ट म्हणून आरक्षित केला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून या भागाचे संवर्धन केले जाते. तसे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र या फलकाला भीक न घालता भूमाफियांनी या मोकळ्या पट्ट्याच्या काही भागात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी पत्र्याचे कुंपण लावून जागा बळकावल्या आहेत, तर काहींनी बळकावलेल्या जागा लाकडाच्या वखारी, भंगार विक्रेते, बांधकाम व्यावसायिकांना सेंट्रिंगचे साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने दिल्या आहेत.बळकावलेल्या जागांना पत्र्याचे कुंपण ठोकून काहींनी चायनिजचे धाबे सुरू केले आहेत. महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने तर या ठिकाणी चक्क धार्मिक स्थळ उभारले आहे.
या ट्री बेल्टच्या खाडीकडील बाजूस महापालिकेने एक छोटा रस्ता बनविला आहे. परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी त्याचा वापर करतात. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांना दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी सुध्दा हा रस्ता उपयुक्त ठरला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्याच्या मधोमध डेब्रिजची गाडी रिकामी करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना व रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्याचा अडथळा होत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे सिडको आणि महापालिका या दोन्ही प्रशासनाने सोयीस्कररीत्या पाठ फिरविली आहे. महापालिकेच्या विभाग कार्यालयाने तर अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

 

Web Title: Encroachment on the tree belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.