पोलीस ठाण्याच्या भूखंडावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:20 IST2019-07-12T23:20:18+5:302019-07-12T23:20:24+5:30

सानपाडा येथील प्रकार : परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

Encroachment on the police station's plot | पोलीस ठाण्याच्या भूखंडावर अतिक्रमण

पोलीस ठाण्याच्या भूखंडावर अतिक्रमण

नवी मुंबई : सानपाडा पोलीसठाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या भूखंडावरील भंगार वाहनांचे अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. परिणामी, त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सानपाडा सेक्टर १४ येथे पोलीसठाण्यासाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. सध्या ज्या ठिकाणी सानपाडा पोलिसांचा कारभार चालत आहे, ती जागा अपुरी शिवाय तात्पूर्त्या स्वरूपाची आहे. यामुळे त्या ठिकाणी पोलिसांसह तक्रारीच्या निमित्ताने येणाऱ्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सानपाडा पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र जागा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत करण्यात आला होता.
त्यानुसार सानपाडा सेक्टर १४ येथील १ क्रमांकाचा भूखंड पोलीस ठाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे; परंतु विविध कारणांमुळे अद्याप त्या ठिकाणी पोलीसठाण्याची इमारत उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे हा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून मोकळा पडल्याची संधी साधून त्यावर भंगारातील वाहने साठवण्यात आली आहेत. अशातच पावसामुळे सदर भूखंडावर झुडपे वाढली आहेत. तर भंगारातील वाहनांमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची पैदास होत आहे. शिवाय, परिसरातील भटकी कुत्रीही त्याच ठिकाणी दबा धरून बसत असून, संधी साधून पादचाऱ्यांवर हल्ला करत आहेत.
पालिकेने स्वच्छता अभियान राबवताना विविध ठिकाणी रस्त्यावर नादुरुस्त स्थितीमध्ये उभी असलेली ही वाहने उचलून त्या ठिकाणी जमा केली आहेत, त्यामुळे एकीकडे शहर स्वच्छता अभियान राबवताना, दुसरीकडे ठरावीक नोडचे विद्रूपीकरण केले जात असल्याचा संताप सानपाडातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, हा भूखंड पोलीसठाण्यासाठी असल्याने त्याचा वापर करण्यासाठी पोलिसांचीही परवानगी घेण्यात आलेली नाही.
परिणामी, ही वाहने त्या ठिकाणावरून हटवावीत यासाठी स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते.
त्यानंतरही प्रशासन ही वाहने त्या ठिकाणावरून हटवण्यात उदासीनता दाखवत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस ठाण्यासाठी राखीव असलेल्या मोकळ्या भूखंडावर पालिकेनेच साठवलेल्या भंगारामुळे परिसराची शोभा जात आहे. शिवाय त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाहने त्या ठिकाणावरून हटवण्यात यावी यासाठी यापूर्वी आंदोलनही करण्यात आलेले आहे. त्यानंतरही तिथले भंगार हटवले जात नसल्याने पालिकाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे.
- दशरथ भगत, माजी नगरसेवक

Web Title: Encroachment on the police station's plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.