ई-कचऱ्यातून साकारला ‘भारत’
By Admin | Updated: November 4, 2015 01:03 IST2015-11-04T01:03:17+5:302015-11-04T01:03:17+5:30
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने २२ जुन्या संगणकाच्या मदर बोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार केला आहे. चार दिवस परिश्रम करून तयार केलेल्या साडेचार

ई-कचऱ्यातून साकारला ‘भारत’
नवी मुंबई : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने २२ जुन्या संगणकाच्या मदर बोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार केला आहे. चार दिवस परिश्रम करून तयार केलेल्या साडेचार फूट उंच व ४ फूट रुंदीच्या नकाशाला ‘मदर इंडिया बोर्ड’ असे नाव दिले आहे. पालिका प्रशासनाने टाकाऊपासून टिकावू वस्तू तयार करण्याचे आवाहन कृतिशीलतेमधून शहरवासीयांना केले आहे.
देशातील सर्वच महानगरांमध्ये ई- कचऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. नादुरुस्त संगणक, मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे करायचे काय, त्यांची विल्हेवाट कशी लावायची, असो प्रश्न सर्वच महापालिका व शासकीय आस्थापनांना भेडसावू लागले आहेत. नवी मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात हा कचरा तयार होत आहे. ई-कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात यावा. टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक टिकाऊ वस्तू तयार कराव्या, असे आवाहन प्रशासनाने शहरवासीयांना केले होते. परंतु यासाठी सर्वांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी संगणकाच्या मदर बोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार करण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन सोसायटी फोरम संस्थेचे कलावंत किशोर बिश्वास, बिनॉय के, अबू रमिझा, आॅल्विन आॅगस्टीन, अरीफ मोहम्मद शेख, जसपालसिंग नोएल, मच्छिंद्र पाटील यांनी नादुरुस्त संगणकाच्या २२ मदर बोर्डचा वापर करून चार दिवसांमध्ये साडेचार फूट उंच व ४ फूट रुंद देशाचा नकाशा तयार केला आहे. मदर बोर्डचा वापर करून तयार केलेला देशाचा नकाशा व भारतमाता ही भारतीयांच्या मनातील भावना एकत्र करून या बोर्डला ‘मदर इंडिया बोर्ड’ असे नाव दिले आहे. या नकाशामध्ये महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई व येथील मुख्यालयाचे स्थान दर्शविण्यात आले आहे.
पालिका मुख्यालयामधील तिसऱ्या मजल्यावरील घनकचरा उपायुक्तांच्या दालनामध्ये ‘मदर इंडिया बोर्ड’ लावण्यात आला आहे. महापौर सुधाकर सोनावणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. आयुक्तांनी हा नकाशा तयार करणाऱ्या टीमच्या कल्पकतेचे कौतुक केले. ई- वेस्ट कलाविष्काराचा देशातील अभिनव उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणरक्षण व पालिका क्षेत्राला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अशाप्रकारे नवीन प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. संजय पत्तीवार, अंकुश चव्हाण, जगन्नाथ सिन्नरकर, अमरीश पटनिगिरे, प्रकाश राजाळे, दादासाहेब चाबूकस्वार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)