पाणी टंचाईमुळे तुर्भेवासीयांमध्ये तीव्र असंतोष, २५ ऑक्टोबरला आंदोलन
By नामदेव मोरे | Updated: October 19, 2023 18:52 IST2023-10-19T18:51:29+5:302023-10-19T18:52:07+5:30
नवी मुंबईमधील तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, गणपतीपाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर, हनुमान नगर, महानगरपालिका प्रभाग ४८, ६८, ६९, ७०, ७१ व ७३ मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

पाणी टंचाईमुळे तुर्भेवासीयांमध्ये तीव्र असंतोष, २५ ऑक्टोबरला आंदोलन
नवी मुंबई : तुर्भे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन विशेष जलवाहिनी टाकण्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पाण्यासाठी २५ ऑक्टोबरला ठाणे बेलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे.
नवी मुंबईमधील तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, गणपतीपाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर, हनुमान नगर, महानगरपालिका प्रभाग ४८, ६८, ६९, ७०, ७१ व ७३ मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या परिसराला एमआयडीसीकडून येणारे पाणी पुरविले जात आहे. एमआयडीसीकडून पाणी घेण्यासाठी महानगरपालिका महिन्याला दोन कोटी रूपये खर्च करत आहे. परंतु यानंतरही रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. रात्री १२ ते २ वाजता पाणी सोडले जाते. नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर जागावे लागत आहे. यानंतरही पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी आक्रमक भुमीका घेतली आहे. पाच वर्षापासून शांततेने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. जून २०२२ मध्ये प्रशासनाने उरण फाटा येथून विशेष जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला एक वर्ष झाल्यानंतरही अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. मनपा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील जाणीवपुर्वक झोपडपट्टी परिसरावर अन्याय करत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. विशेष जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरीत सुरू करावे अन्यथाला पाण्यासाठी २५ ऑक्टोबरला ठाणे बेलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे.
तुर्भे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणी प्रश्न सोडविला जात नसल्यामुळे २५ ऑक्टोबरला ठाणे बेलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
सुरेश कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख शिवसेना