वाढत्या बांधकामांमुळे रोडपालीत धुरळा, नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:07 AM2019-11-26T03:07:32+5:302019-11-26T03:08:07+5:30

रोडपाली नोडमध्ये पाणी, कचरा, अवजड वाहतूक आदी समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. ट्रक, कंटेनर, रासायनिक टँकर रस्त्यावर बेकायदेशीर उभे केले जातात.

Due to increasing construction, the road is dirty, the citizens are shocked | वाढत्या बांधकामांमुळे रोडपालीत धुरळा, नागरिक हैराण

वाढत्या बांधकामांमुळे रोडपालीत धुरळा, नागरिक हैराण

Next

- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : रोडपाली नोडमध्ये पाणी, कचरा, अवजड वाहतूक आदी समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. ट्रक, कंटेनर, रासायनिक टँकर रस्त्यावर बेकायदेशीर उभे केले जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होतेच; शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या ठिकाणी मोठमोठी बांधकामे सुरू असल्याने रस्त्यावर मातीच माती पसरली आहे. त्यामुळे परिसरात धूळप्रदूषण वाढले असून त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून येत आहेत.

कळंबोली वसाहतीच्या वरच्या भागात साडेबारा टक्के जमिनीवर रोडपालीचे सेक्टर विकसित करण्यात आले आहेत. सेक्टर १३, १४, १५, १६, १७ आणि २० येथे नागरी वस्ती आहे. येथे तीन वर्षांपूर्वी केबल टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे बरेच रस्ते उखडले आहेत. सिडकोने त्यावर अद्याप मलमपट्टी केलेली नाही.

सध्या रोडपाली तलावालगतच्या भूखंडावर सिडकोचे गृहनिर्माण सुरू आहे. येथे अनेक इमारती उभ्या राहत आहेत. सेक्टर १७ येथे श्री बालाजी इंटरनॅशनल स्कूचे कामही जलद गतीने सुरू आहे. दुसऱ्या बाजूला प्लॅटीनम हे खासगी गृहसंकुल उभे राहत आहे. याशिवाय परिसरात अन्य इमारतींचीही काम सुरू आहेत. मुख्यालय रस्त्यावरील राधेकृष्णा सोसायटीच्या बाजुला मोकळ्या जागेत मातीचा भराव करण्यात आला आहे. याशिवाय या भागात पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामाकरता मोठे खोदकाम केले जात आहे. येथील माती उचलून दुसºया ठिकाणी वाहून येत असताना ती रस्त्यावर पडते. तसेच बांधकाम साहित्य आजूबाजूला पडल्याने रस्त्यावर माती पसरल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय झाला होता. आता तापमानात वाढ झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. एखादे वाहन गेल्यास प्रचंड धूळ उडते, त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला आहे. रोडपाली गावासह सेक्टर १५, १७ आणि २० मधील वातावरण धूरकट झाले आहे. वाहने वेगाने गेल्यावर धूळ उडत असल्याने जिकडेतिकडे धूळच दिसत आहे. याचा त्रास पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही होत आहे.

आजूबाजूच्या इमारतीमध्येही धूळ उडत असल्याने दारे-खिडक्या कायम बंद ठेवाव्या लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच परिसरातील दुकानदारही धुलीकणामुळे हैराण झाले आहेत.

डंपर आणि हायवामधून बाहेर पडलेली माती त्वरीत बाजूला करणे, हे त्या त्या बांधकाम ठेकेदारांचे काम आहे. तसेच धूळ उडू नये म्हणून त्यावर पाणी मारणे गरजेचे आहे. परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे प्रभाग सात मधील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी महापालिका आणि सिडकोकडे केली आहे. याविषयी त्या त्या ठेकेदार आणि बिल्डरांना सूचना द्यावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अवजड वाहतुकीचाही त्रास
सेक्टर १७ आणि २० येथील अंतर्गत रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. तसेच मोकळ्या भूखंडांवरही वसुलीदादांमार्फत बेकायदेशीर पार्र्किं ग सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. आतमधील माती मोठ्या वाहनांमुळे रस्त्यावर येते. यावरून ट्रक, कंटेनर आणि टँकर गेल्यावर धुरळा उडत असल्याचे रोडपाली येथील स्थानिक रहिवासी अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बांधकाम परवानगीचे नियम धाब्यावर
पनवेल महापालिकेने रोडपालीतील गृहप्रकल्पांना बांधकामाची परवानगी दिली आहे. ही परवानगी देत असताना आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होता कामा नये. तसेच बांधकाम साहित्य आणि माती, डबर, ग्रीट पावडर, सळई रस्त्यावर पडता कामा नये, याप्रमाणे अनेक अटी आणि शर्ती घातल्या जातात. परंतु रोडपाली येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी हे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या परवानगी देणाºया विभागाकडून याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे.

Web Title: Due to increasing construction, the road is dirty, the citizens are shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.