पारा वाढल्याने प्रचार होणार ‘ताप’दायक; उमेदवारांची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:48 IST2019-03-27T00:47:30+5:302019-03-27T00:48:30+5:30
मार्चअखेरीस नवी मुंबई, पनवेलचा पारा ४१ अंशावर गेला असून, याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रचार फक्त सोशल मीडियावरून सुरू आहे.

पारा वाढल्याने प्रचार होणार ‘ताप’दायक; उमेदवारांची डोकेदुखी वाढली
नवी मुंबई : मार्चअखेरीस नवी मुंबई, पनवेलचा पारा ४१ अंशावर गेला असून, याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रचार फक्त सोशल मीडियावरून सुरू आहे. तापमान असेच राहिले तर कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरविताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असून, उमेदवारांचीही डोकेदुखी वाढली आहे.
ठाणे मतदारसंघामधील ऐरोली व बेलापूर हे दोन मतदारसंघ नवी मुंबईमध्ये आहेत. मावळमधील उरण व पनवेलचा समावेश होतो. या दोन्ही मतदारसंघामध्ये २९ एप्रिलला निवडणूक होणार आहे. आघाडी व युतीचे उमेदवार निश्चित झाले असून दोन्हीकडून प्रचार सभा व बैठकांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेऊन कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले आहे. युतीच्या नेत्यांनीही पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन घर चलो अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र वाढत्या तापमानामुळे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत. या आठवड्यामध्ये तापमान ४१ अंशावर पोहचले आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये १० एप्रिलनंतर प्रचाराला गती येण्याची शक्यता आहे. तेव्हापर्यंत तापमान अजून वाढणार असून कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये कसे उतरवायचे असा प्रश्न नेत्यांना पडू लागला आहे. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावरून प्रचार करण्यात व्यस्त झाले आहेत. नेत्यांची भूमिका व केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविताना विरोधी पक्षांवर टीका करणारे व्हिडीओ व बातम्याही एकमेकांना फॉरवर्ड करण्यास सुरुवात झाली आहे.
नवी मुंबईमधील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता उन्हाचा परिणाम प्रचारावर होणार असल्याचे अनेकांनी मान्य केले. सद्यस्थितीमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. प्रचारामध्येही त्याचाच मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे आधुनिक तंत्राचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जात आहे. आधुनिक साधने कितीही वाढली तरी थेट संपर्क साधल्याशिवाय मतदारांना आकर्षित करता येत नाही. विविध समाज, संघटना, गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी या सर्वांना प्रत्यक्ष भेटणे आवश्यक आहे. अद्याप घरोघरी जाऊन प्रचार सुरू झालेला नाही. कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहचण्यासाठी रॅली व इतर उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जनतेशी संपर्क तुटत आहे
महापालिकेमध्ये उपमहापौर व इतर महत्त्वाच्या पदावर काम करणाºया एका नेत्याने सांगितले की, उन्हाळ्याचा थेट परिणाम प्रचारावर होऊ लागला आहे. निष्ठावंत कार्यकर्तेही राहिलेले नाहीत. यामुळे आता रॅली काढून दिखावा करणे व सोशल मीडियावरून पोस्ट पाठविणे एवढ्यापुरताच प्रचार मर्यादित राहू लागला आहे. यामुळे जनतेशी व नवमतदारांशी संपर्क तुटत आहे. तापमानामुळे त्रस्त कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचेही स्पष्ट केले.
सोशल मीडियासाठी स्वतंत्र सेल
प्रचारामध्ये सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे व उन्हाळ्यामुळे कार्यकर्ते थेट घरोघरी जाण्यास अनुत्सुक असल्यामुळे राजकीय पक्षांनी स्वतंत्र सेल तयार केले आहेत. राष्ट्रवादीचा सेल अनेक वर्षांपासून काम करत आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेचे नेते व उमेदवारावर टीका करत असल्यामुळे सेनेनेही त्याला उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांचे सोशल वॉर सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दोन्ही ठिकाणी बाहेरील उमेदवार
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रस या दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार ठाण्यामधील आहेत. मावळ मतदार संघामध्येही दोन्ही उमेदवार घाटावरील आहेत. यामुळे नवी मुंबई, पनवेल व उरणमधील नागरिकांना बाहेरील उमेदवाराचा प्रचार करावा लागणार असल्यामुळे प्रचारामध्ये अनुत्साह दिसून येत आहे.