होल्डिंग पॉण्ड्समुळे १0 गावांना पुराचा धोका
By Admin | Updated: March 17, 2016 02:32 IST2016-03-17T02:32:22+5:302016-03-17T02:32:22+5:30
द्रोणागिरी येथे सिडकोने उभारलेल्या होल्डिंग पॉण्ड्समध्ये बेसुमार खारफुटीची वाढ झाली आहे. त्यामुळे पॉण्डची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली झाल्याने पावसाळ्यात पॉण्ड्समधील

होल्डिंग पॉण्ड्समुळे १0 गावांना पुराचा धोका
नवी मुंबई : द्रोणागिरी येथे सिडकोने उभारलेल्या होल्डिंग पॉण्ड्समध्ये बेसुमार खारफुटीची वाढ झाली आहे. त्यामुळे पॉण्डची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली झाल्याने पावसाळ्यात पॉण्ड्समधील पाणी बाहेर फेकले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील १० गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर या पॉण्ड्सची साफसफाई करण्यासाठी सिडकोचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र मागील आठ वर्षांपासून हा प्रश्न जैसे थे असल्याने याचा फटका या परिसराच्या विकासाला बसला आहे.
खाडीकिनारी वसलेल्या नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने शहराच्या ड्रेनेज सिस्टीमचा भाग असणारी होल्डिंग पॉण्ड्सची बांधणी डच पद्धतीने करण्यात आली आहे. द्रोणागिरी परिसरातही सिडकोने अशा प्रकारे सहा होल्डिंग पॉण्ड्स उभारली आहेत. परंतु गेली अनेक वर्षे या पॉण्ड्ची साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी या पॉण्ड्समध्ये बेसुमार खारफुटींची वाढ झाली आहे. गाळाची पातळी वाढल्याने पॉण्ड्सची खोली व रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी आजूबाजूच्या १० गावांत शिरून तेथील स्थानिकांचे मोठे नुकसान होत आहे. याचा फटका परिसरातील विकास प्रकल्पांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर सदर पॉण्ड्सची साफसफाई करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सिडकोने संबंधित प्राधिकरणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात सिडकोने उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानुसार २०१३ मध्ये न्यायालयाने मिनिस्ट्री आॅफ एन्व्हायर्मेटल अँड फॉरेस्टची (एमओईएफ) परवानगी घेऊन या पॉण्ड्सची साफसफाई करण्याचे सुचित केले होते. परंतु एमआयईएफने या प्रकरणी निर्णय देण्यास दिरंगाई केल्याने २०१५ मध्ये सिडकोने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने एमओईएफने या प्रकरणी काय निर्णय घेतला याचा ११ मार्च २०१६ पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले. मात्र मुदत उलटून गेली तरी एमओईएफने यासंदर्भातील आला अहवाल सादर केला नाही. त्यामुळे द्रोणागिरी नोडच्या विकासाला पुन्हा एकदा बे्रक लागला आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, जेएनपीटी पोर्ट सिटी, नैना प्रकल्प व न्हावाशेवा-शिवडी सी लिंक प्रकल्पामुळे द्रोणागिरी नोडला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु एमओईएफकडून पॉण्ड्सच्या साफसफाईला परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने याचा अप्रत्यक्ष फटका या परिसरातील बहुद्देशीय प्रकल्पांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, एमओईएफने या प्रकरणी दिल्लीत अलीकडेच एक बैठक बोलाविली होती. या बैठकीत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी सिडकोची सविस्तर बाजू मांडली होती. होल्डिंग पॉण्ड्सची वेळोवेळी साफसफाई न झाल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता ४५० एमएलडीवरून ९० एमएलडी इतकी कमी झाली आहे. त्यामुळे खाडीचे पाणी पॉण्डऐवजी परिसरातील वसाहतीत पसरते. पावसाळ्यात तर गावांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर एमओईएफने ड्रेनेज सिस्टीमला अडथळा आणणारे मॅन्ग्रोज काढण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती व्ही. राधा यांनी या बैठकीत केली होती. विशेष म्हणजे सिडकोने यासंदर्भात एमसीझेडएमएकडे पण दाद मागितली होती. पडताळणीनंतर एमसीझेडएमएने देखील सदर होल्डिंग पाँड्सचा परिसर सीआरझेड क्षेत्रात मोडत नसल्याचे केंद्र सरकारला कळविले आहे.
- द्रोणागिरी परिसरातील सहा होल्डिंग पॉण्डमध्ये अनियंत्रित वाढलेली खारफुटी आणि साचलेला गाळ काढण्याची परवानगी मिळावी यासाठी सिडकोचा गेल्या आठ वर्षांपासून केंद्रीय पर्यावरण खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या पॉण्ड्सची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने परिसरातील १0 गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच बेसुमार खारफुटीमुळे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यासाठी सिडकोने आरक्षित ठेवलेली जवळपास ११ हेक्टर जमीन बाधित झाली आहे.