ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 06:18 IST2025-04-30T06:15:36+5:302025-04-30T06:18:30+5:30

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्जमाफिया कमल चांदवाणी ऊर्फ के. के. याचे रॅकेट उघड केले आहे.

Drug mafia breached Mumbai airport security; two policemen including customs superintendent arrested for clearing drug parcels | ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक

ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक

नवी मुंबई : विमानतळावर आलेले ड्रग्सचे पार्सल ‘क्लिअर’ करणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यासह दोन पोलिसांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नेरूळमधील विदेशी (हायड्रो) गांजावरील कारवाईनंतर तपासात ही साखळी उघड झाली आहे. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत दहा जणांना अटक झाली आहे.

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्जमाफिया कमल चांदवाणी ऊर्फ के. के. याचे रॅकेट उघड केले आहे. याशिवाय त्याला ड्रग्ज तस्करीत सहकार्य करणारे मुंबई विमानतळावरील विदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधीक्षक प्रशांत गौर, पोलिस हवालदार सचिन भालेराव, पोलिस नाईक संजय फुलकर यांनाही अटक केली आहे. कमल हा विदेशातून पार्सलद्वारे ड्रग्ज मागवून मुंबई विमानतळावर गौरच्या माध्यमातून पार्सल क्लिअर करायचा, तर त्याच्यासोबत अर्थपूर्ण हितसंबंध जोपासल्याप्रकरणी भालेराव व फुलकर यांच्यावर कारवाई केली आहे.

हवालामार्फत व्यवहार

फुलकर हा अमली पदार्थविरोधी पथकाचाच कर्मचारी आहे, तर कमलला विदेशातून नवीन चिचकर ड्रग्ज पाठवायचा, अशी शक्यता आहे. यापूर्वी अटक केलेला सुजित बंगेरा व कमल ड्रग्जच्या व्यवहाराची रक्कम हवाला मार्फत घ्यायचे. त्यानुसार अंकित पटेल व रिकुंदकुमार पटेल या दोन अंगडियांनाही अटक केली आहे.

७३ लाखांचा माल हस्तगत

गुन्हे शाखा पोलिसांनी या कारवाईत अद्यापपर्यंत ७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये १३ लाख ७५ हजारांचा हायड्रो गांजा, १ लाखाचा गांजा, अमली पदार्थ सेवनाच्या ७० हजाराच्या मशीन, चार कार व १४ लाख १२ हजारांची रोख यांचा समावेश आहे.

पाच राज्यांतही ड्रग्ज पोहोचवले गेले आहे का?

कमल याचे ड्रग्सचे पार्सल क्लिअर करून देणाऱ्या मुंबई विमानतळावरील प्रशांत गौर याच्याकडे महाराष्ट्रासोबतच छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांत येणारे विदेशी पार्सल तपासणीची जबाबदारी होती. त्याचेच ड्रग्जमाफियांसोबतचे धागेदोरे उघड झाल्याने संबंधित पाच राज्यांतही ड्रग्ज पोहोचवले गेले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संशयितांची चौकशी

गोपनीय माहितीद्वारे अमली पदार्थविरोधी पथकाने नेरूळमध्ये केलेल्या कारवाईत पुढील रॅकेटची माहिती समोर आली होती. त्यावरून पुढील तपासात कस्टम अधीक्षकासह दोन पोलिस कर्मचारी अशा दहा जणांना अटक केली असल्याचे अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले, तर इतरही अनेक जण संशयित असून, त्यांचीही चौकशी होणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: Drug mafia breached Mumbai airport security; two policemen including customs superintendent arrested for clearing drug parcels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.