नशामुक्ती अभियान ड्रग्जमाफियांच्या खिशात; काही कर्मचाऱ्यांकडून अभियानाला सुरुंग लावण्याचे काम
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 2, 2025 11:21 IST2025-05-02T11:20:13+5:302025-05-02T11:21:47+5:30
यावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच काही पोलिसांचेच आंतराष्ट्रीय ड्रग्जमाफियांसोबत असलेले संबंध उघड झाले.

नशामुक्ती अभियान ड्रग्जमाफियांच्या खिशात; काही कर्मचाऱ्यांकडून अभियानाला सुरुंग लावण्याचे काम
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : राज्यातल्या ड्रग्जविरोधी अभियानाची सुरुवात ज्या नवी मुंबईतून झाली, तिथल्या पोलिसांचेच ड्रग्जमाफियांसोबत असलेले संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारताच जानेवारीत नवी मुंबईतून या अभियानाची सुरुवात केली होती. शहरात जरी अभियान सुरू असले, तरी प्रत्यक्षात मात्र ठिकठिकाणी ड्रग्जची विक्री सुरूच होती. यावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच काही पोलिसांचेच आंतराष्ट्रीय ड्रग्जमाफियांसोबत असलेले संबंध उघड झाले. दोन चार चेहरे समोर आले असले तरीही, वर्दीतल्या अनेकांचे हात काळे झाले असल्याची दाट शक्यता असून, तिथपर्यंत आयुक्तांचे हात पोहोचतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
ड्रग्जच्या माध्यमातून नवी मुंबईतल्या तरुणाईला उद्ध्वस्त करण्याचे काम मागील दहा वर्षांत झाले आहे. त्यापैकी २०१९ ते २०२२ या कालावधीत काही अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची छाप उमटवत ड्रग्जविरोधात अनेक प्रभावी मोहीम राबविल्या होत्या. त्यानंतर मात्र ड्रग्जविक्रेते, पुरवठादार यांच्यासाठी नवी मुंबईत मोकळे रान झाले होते. त्यानंतर विद्यमान आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ड्रग्जविरोधी अभियानात रुची घेऊन तशा कारवायांचा धडाका लावला; परंतु समोर जरी अभियानाचा बोलबाला सुरू असला तरी स्थानिक पातळीवर अभियानाला सुरुंग लावण्याचे काम काही कर्मचारीच करत होते.
कलेक्टर लॉबीतल्या स्पर्धेत पितळ उघडे
ड्रग्जतस्करीत असलेल्या विदेशी नागरिकांवर कारवाईचा धडाका सुरू असताना कमल चांदवाणी याने थेट खाकीलाच सोबतीला घेऊन शहरभर आपले जाळे तयार केले. त्याला पाठबळ देणारे हवालदार सचिन भालेराव, पोलिस नाईक संजय फुलकर हे मोहरे असून, इतरही अनेकांचे ड्रग्जमध्ये हात गुंतल्याचे समजते. केवळ येत्या बदल्यांमध्ये येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांपुढे आपलाच पर्याय ठेवण्याच्या कलेक्टर लॉबीतल्या स्पर्धेत त्यांचे पितळ उघडे पाडल्याच्याही चर्चा पोलिस वर्तुळात आहेत.
मुंबई एनसीबीच्या हिटलिस्टवर असलेला आंतराष्ट्रीय ड्रग्जमाफिया नवीन चिचकर याचा नवी मुंबईतला हस्तक म्हणून कमल चांदवाणी (५६) ओळखला जातो. थायलंडसह इतर देशांतून पार्सलच्या आडून आलेले ड्रग्ज मुंबई विमानतळावर थेट कस्टम अधीक्षकालाच हाताशी धरून तो सोडवायचा. यावरून ड्रग्जतस्करांना नफ्याची टाळी देण्यात शासकीय अधिकाऱ्यांमध्येही लागलेली स्पर्धा उघड झाली. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात ड्रग्जविरोधी अभियान प्रभावीपणे राबवू शकतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
शापित खुर्ची
अमली पदार्थविरोधी पथक म्हटले की, खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांचेही कामापुरते ड्रग्जविक्रेते, पुरवठादार यांच्याशी संबंध येतोच; परंतु एखाद्या अधिकाऱ्याने मैत्रीपूर्ण संबंध नाकारून माफियावर कारवाईचा हात टाकण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांची उचलबांगडी करण्यापर्यंतचे सामर्थ्य ड्रग्जमाफिया व त्यांच्या हाताखालचे बाहुले बनलेल्या पोलिस बाबूंनी यापूर्वी दाखवून दिले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथकाचे नेतृत्व म्हणजे शापित खुर्ची आहे, अशी अधिकाऱ्यांतच चर्चा आहे.