दुष्काळातही पाण्याची उधळपट्टी सुरू

By Admin | Updated: September 23, 2015 04:23 IST2015-09-23T04:23:31+5:302015-09-23T04:23:31+5:30

गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडला असल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहिम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.

In the drought, the water scarcity continues | दुष्काळातही पाण्याची उधळपट्टी सुरू

दुष्काळातही पाण्याची उधळपट्टी सुरू

प्राची सोनवणे, नवी मुंबई
गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडला असल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहिम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. पाणी गळती, चोरी व पिण्याच्या पाण्याचा वाहने धुणे व उद्यानासाठीही वापर केला जात आहे.
नवी मुंबईकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले आहे. यामुळे शहरवासीयांना २४ तास पाणीपुरविणे शक्य झाले आहे. २०१२ च्या भीषण दुष्काळात राज्यातील सर्व शहरांमध्ये पाणीकपात सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत होता. सद्यस्थितीमध्ये ३६० एमएलडी पाणी धरातून घेतले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी साठा समाधानकारक असला तरी गतवर्षी २२ सप्टेंबरला मोरबे परिसरात तब्बल २०३५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी फक्त १५५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा तब्बल ४८५मिलीमिटर पाऊस कमी आहे. सद्यस्थितीमध्ये धरणातील पाणीसाठा मार्चपर्यंतच पुरू शकतो. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतू शहरवासी पाण्याची प्रचंड उधळपट्टी करत आहेत. अनेक सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या ओसांडून वाहत असतात. पाईपलाईनने वाहने व झाडांना पाणी घातले जात आहे. झोपडपट्टीमध्ये सार्वजनीक नळ सुरूच ठेवला जात आहे. पालिकेच्या उद्यान व दुभाजकांमधील वृक्षांनाही नळाने पाणी घातले जात असून अनेक उद्यानांना तलावाचे स्वरूप येवू लागले आहे. पाण्याच्या उधळपट्टीविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
महापालिका क्षेत्रात १९ टक्के पाणीगळती आहे. यामध्ये पाणी चोरीचाही समावेश आहे. काही हॉटेल व इतर व्यवसायिक चोरून पाणी वापर असल्याचे बोलले जात आहे. पाण्याचा होणारा गैरवापर, पाणीचोरी, या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने कडक भुमिका घेण्यास सुरूवात केली आहे. पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार केलले आहे. आतापर्यंत ४ हजार पेक्षा जास्त नागरिकांना नोटीस पाठविल्या आहेत. या सर्वांना पाण्याची उधळपट्टी केल्यास कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली परिसरातील हीच स्थिती आहे. पाईपलाईनला छिद्र पाडून पाण्याची चोरी सुरू आहे. पाण्याची गळती थांबविण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. पाणी चोरी करणारांवरही काहीच कारवाई होत नाही.
नवी मुंबई महापालिकेने सोशल मीडिया, भित्तीपत्रके, शाळेतील शिबिर घेऊन पाणीबचतीविषयी जनजागृती सुरू केली आहे. पाण्याची उधळपट्टी करणारांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. परंतु पनवेल तालुक्यात मात्र फारशी जनजागृती केली जात नाही. खारघर ते कळंबोलीपर्यंतच्या सिडको नोडमध्येही सिडको प्रशासनाकडून जनजागृती केली जात नाही. पाण्याची उधळपट्टी करणारांवर काहीच कारवाई होत नसल्यामुळे दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
पनवेल परिसरामध्ये जीवन प्राधिकारणाच्या पाइपलाइनला अनेक ठिकाणी छिद्रे पाडण्यात आली आहेत. झोपडपट्टी व इतर ठिकाणचे नागरिक या पाण्याचा उपयोग करीत आहेत. २४ तास पाणी सुरू असल्यामुळे रोज हजारो लीटर पाणी गटारामध्ये जात आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे गळती व त्यामधून पाणी चोरी सुरू आहे. परंतु जीवन प्राधिकरणाचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.
जलबचतीसाठी शहरामध्ये जनजागृतीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शाळा, महाविद्यालये तसेच शहरातील सर्वच महत्त्वाच्या परिसरांध्ये जनजागृती केली जात आहे. पाणी चोरी आणि गळती या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुरेपूर प्रयत्न केले जातात. अनधिकृतपणे पाण्याची चोरी करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून, आतापर्यंत ४ हजारहून अधिक जणांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.
- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा)

Web Title: In the drought, the water scarcity continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.