‘ड्रीम गर्ल’ने राजस्थानमध्येही लावले अनेकांना गळाला, फजिती टाळण्यासाठी तक्रार करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:27 IST2025-02-22T08:27:30+5:302025-02-22T08:27:51+5:30
डेटिंग ॲपवरून ३३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाने राजस्थानमध्येही अनेकांना चुना लावला आहे.

‘ड्रीम गर्ल’ने राजस्थानमध्येही लावले अनेकांना गळाला, फजिती टाळण्यासाठी तक्रार करण्यास नकार
नवी मुंबई : डेटिंग ॲपवरून ३३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाने राजस्थानमध्येही अनेकांना चुना लावला आहे. त्यात काही पोलिस कर्मचारी व इतरही व्यक्तींचा समावेश समोर आला आहे. सोशल मीडियावरील मुलींचे फोटो वापरून त्याने या सर्वांना मधाळ संभाषणातून गळाला लावून पैसे उकळले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीची डेटिंग ॲपवरून फसवणूक झाल्याची घटना घडली होती. त्यांनी चॅटिंग करणाऱ्या तरुणीच्या संभाषणाला भुलून तिच्या भेटीच्या ओढीने ३३ लाखांची उधळण केली होती. यानंतरही ती हाती न लागल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता ती तरुणी नसून तरुण असल्याचे समोर आले होते.
...म्हणून तक्रारीस नकार
राजस्थानच्या संजय मीना याने तक्रारदारासह राजस्थानमधीलही अनेकांना गळाला लावून पैसे उकळले आहेत. त्यात पोलिस कर्मचारी, इतरही व्यक्ती फसले आहेत. संजयने वापरलेल्या बँक खात्याच्या व डेटिंग ॲपच्या मदतीने पोलिस संबंधितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
काहींनी आपला हनी ट्रॅप झाल्याचे लक्षात येऊनही फजिती टाळण्यासाठी तक्रार करण्यास नकार दिला आहे. संजयने सोशल मीडियावरील मुलींचे फोटो वापरून संबंधितांना भुरळ घालून भेटीची ओढ लावून पैसे उकळले आहेत.