‘जैत रे जैत’ चे भयाण वास्तव
By Admin | Updated: October 7, 2016 05:45 IST2016-10-07T05:45:06+5:302016-10-07T05:45:06+5:30
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील

‘जैत रे जैत’ चे भयाण वास्तव
नामदेव मोरे / नवी मुंबई
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला ते आदिवासी मात्र अद्याप दारिद्र्याशीच झुंज देत आहेत.
रानसई व कर्नाळा परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी ठाकर समाजाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले ते प्रसिद्ध कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांनी. १९६५मध्ये त्यांची ‘जैत रे जैत’ कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीला मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आदिवासी ठाकर समाजाचे जीवन सर्वांसमोर आले. कादंबरीचा नायक नाग्या ठाकूर व चिंधीही लोकप्रिय झाली. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी डॉ. जब्बार पटेल यांना या कादंबरीमध्ये संगीतमय चित्रपटासाठीचा दमदार मसाला असल्याचे सांगितले. जब्बार पटेल यांनी कादंबरी वाचली व नाग्या व चिंधीच्या प्रेमकथेने त्यांच्या मनावरही गारूड केले आणि ‘जैत रे जैत’ चित्रपट तयार झाला. १९७७ मध्ये चित्रपट प्रसिद्ध झाला व त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवा विक्रम केला. या चित्रपटाने स्मिता पाटील,डॉ. मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा देशपांडे यांच्या अभिनयाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केले. त्यांनी शब्दबद्ध केलेली जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, आम्ही ठाकर ठाकर, नभं उतरू आलं, डोंगर काठाडी ठाकरवाडी ही गीते अजरामर झाली. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये ‘जैत रे जैत’ चा उल्लेख सुवर्णाक्षरांनी झाला. चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली तरी त्याची व त्यामधील गीतांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटासाठी स्मिता पाटील यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
‘जैत रे जैत’च्या निर्मितीमध्ये सहभाग असलेले कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना फायदा झाला परंतु ज्या आदिवासींच्या जीवनावर हा चित्रपट बनविण्यात आला त्या आदिवासी ठाकर समाजबांधवांची परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. ४० वर्षांपूर्वीही आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते व आताही ते दारिद्र्याशीच झुंज देत आहेत. तेव्हाही आदिवासी वाड्यांवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. शिक्षण, वैद्यकीय सुविधा, पाणी, उदरनिर्वाहाचे साधन काहीही नव्हते. आताही तीच स्थिती आहे. पावसाळ्यात भाजीपाला पिकवायचा. उन्हाळ्यात मध गोळा करायचा.
रानमेवा विकून उदरनिर्वाह करायचा हे सर्व तसेच्या तसेच आहे. ‘जैत रे जैत’ चित्रपटाचा विसर कधीच कोणाला पडणार नाही. पण बिचाऱ्या ठाकर समाजाच्या समस्या सोडविण्याचा विसर मात्र सर्वांनाच पडला आहे. चित्रपटाचा नायक जिंकूनही हरतो, तसेच आदिवासीही परिस्थितीपुढे हरले आहेत.
50 वर्षांत काहीच बदल नाही-
गो. नी. दांडेकर यांनी १९६५ मध्ये ‘जैत रे जैत’ कादंबरी लिहिली. डॉ. जब्बार पटेल यांनी १९७८ मध्ये चित्रपट प्रसिद्ध केला. कादंबरी लिहून ५० व चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली. या कालावधीमध्ये देशभर प्रचंड राजकीय, सामाजिक,आर्थिक बदल झाले. पण आदिवासींच्या जीवनामध्ये मात्र काहीच बदल झालेले नाहीत. त्यांच्या समस्या तेव्हा होत्या त्यापेक्षा वाढल्या आहेत. आजही ते गरीबच असून त्यांचे जीवन चित्रपटाच्या नायकाप्रमाणे एक जिवंत शोकांतिका बनले आहे.
चित्रपट सृष्टीलाही विसर-
च्‘जैत रे जैत’ च्या चित्रीकरणासाठी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीमधील दिग्गज कलाकार जवळपास तीन महिने कर्नाळा परिसरात होते. चित्रपटातील एक गीत रानसई गावामध्ये चित्रित करण्यात आले.
च्पायथ्याला असलेल्या कल्ले गावासह कर्नाळा किल्ला व परिसरात सर्व चित्रीकरण झाले. प्रचंड यश मिळाल्यानंतर चित्रपट सृष्टी येथील आदिवासींना विसरून गेली. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी काहीच प्रयत्न केले नाहीत.