प्रक्रिया झालेले सांडपाणी खाडीत, पुनर्वापराबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:11 IST2018-05-07T07:11:48+5:302018-05-07T07:11:48+5:30

मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्याकरिता सिडकोने तयार केलेला २२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा अंमलबजावणीअभावी कागदावरच सीमित राहिला आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने हा प्रस्ताव गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केलेले हजारो लिटर पाणी खाडीत सोडून द्यावे लागत आहे.

In the drainage sewage process, recycling apathy | प्रक्रिया झालेले सांडपाणी खाडीत, पुनर्वापराबाबत उदासीनता

प्रक्रिया झालेले सांडपाणी खाडीत, पुनर्वापराबाबत उदासीनता

- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली - मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्याकरिता सिडकोने तयार केलेला २२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा अंमलबजावणीअभावी कागदावरच सीमित राहिला आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने हा प्रस्ताव गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केलेले हजारो लिटर पाणी खाडीत सोडून द्यावे लागत आहे.
नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे या सिडको वसाहतीची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार मलनि:सारण केंद्रे आहेत. वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर या मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात आहे. त्यानंतर हे पाणी थेट खाडीत सोडले जाते. विशेष म्हणजे, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विविध प्रयोजनासाठी पुनर्वापर होऊ शकतो. उद्याने, बांधकाम, कारखाने आदी ठिकाणी या पाण्याचा वापर करता येणे शक्य असल्याने याबाबत सिडकोने दोन वर्षांपूर्वी नियोजन केले होते. त्यासाठी २२० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. याअंतर्गत प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव होता; परंतु विविध कारणांमुळे हा प्रस्ताव बारगळल्याने सध्या प्रक्रिया झालेले हजारो लिटर पाणी खाडीत सोडण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. मध्यंतरी उरण येथील महाजनकोला वीजनिर्मिती करण्याकरिता प्रक्रिया झालेले सांडपाणी देण्याचेही नियोजन होते; परंतु हा प्रस्तावच रखडल्याने हे नियोजनही फसले. सध्या खारघर येथील सेंट्रल पार्क आणि गोल्फ कोर्समध्ये वापरण्यात येणारे आठ एमएलडी पाण्याचा अपवाद वगळता बाकी सगळे पाणी वाया जात आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत आहे. सिडकोला एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेकडून पाणी घेऊन ते वसाहतींना पुरवावे लागते. त्यांच्याकडून मागणीनुसार पाणी मिळत नसल्याने वसाहतींमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे. उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची निकड भासत असल्याने त्याच्यावर उपाययोजना म्हणून मलनि:सारण केंद्रातून प्रक्रि या झालेल्या पाण्याचा वापर करणे फायदेशीर ठरेल, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार सिडकोने दोन वर्षांपूर्वी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. या प्रकल्पाचे नियोजन करण्याकरिता आराखडा तयार करण्यात आला. त्याकरिता सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात आली होती; परंतु पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडकोने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर होऊ शकला नाही.

समांतर वाहिन्या टाकण्याचा होता प्रस्ताव
पूर्वी पिण्याच्या पाण्याकरिता ज्या ज्या ठिकाणी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्याला समांतर अशा प्रक्रि या झालेल्या पाण्याकरिता जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव होता. सुरुवातीला नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर या नोडमध्ये नेटवर्किंग करण्यात येणार होते. स्वतंत्र वाहिन्यांद्वारे थेट सोसायट्यांना हे पाणी पुरविण्याचे नियोजन होते. मात्र, ते कागदावरच राहिले, हे काम झाले असते तर ५५ एमएलडी पाण्याचा वापर उद्यान, झाडे, कारखाने, सर्व्हिसिंग सेंटर, बांधकाम व इतर कारणाकरिता करता आला असता.

च्उरण येथील महाजनकोला वीजनिर्मिती करण्याकरिता प्रक्रिया झालेले सांडपाणी देण्याचेही नियोजन होते.
च्सध्या खारघर येथील सेंट्रल पार्क आणि गोल्फ कोर्समध्ये वापरण्यात येणारे आठ एमएलडी पाण्याचा अपवाद वगळता बाकी सगळे पाणी वाया जात आहे.
च्सिडकोने सल्लागार एजन्सी नियुक्त केली होती; परंतु पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडकोने याकडे दुर्लक्ष केले.

प्रक्रि या झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याकरिता सिडकोचा प्रस्ताव होता त्यादृष्टीने हालचाली करण्यात आल्या होत्या; परंतु या आजच्या घडीला याबाबत कोणतेच नियोजन नाही. याबाबत फारशी माहिती देता येणार नाही, वरिष्ठ कार्यालयाकडून याविषयी समजू शकेल.
- दिलीप बोकाडे,
कार्यकारी अभियंता,
पाणीपुरवठा विभाग

Web Title: In the drainage sewage process, recycling apathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.