डॉ. सुधाकर शिंदे पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा रुजू होणार?
By Admin | Updated: May 29, 2017 06:37 IST2017-05-29T06:37:01+5:302017-05-29T06:37:01+5:30
पनवेल महानगरपालिका स्थापनेवेळी डॉ. सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर संपूर्ण पालिकेचा चेहरामोहरा बदलला

डॉ. सुधाकर शिंदे पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा रुजू होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिका स्थापनेवेळी डॉ. सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर संपूर्ण पालिकेचा चेहरामोहरा बदलला होता. त्यामुळे शिंदेंना पुन्हा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रु जू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांची उल्हासनगरला तडकाफडकी बदली करण्यात आली असताना निवडणुका संपताच पुन्हा शिंदे यांचा विषय चर्चेत आला आहे.
येत्या ३१ तारखेला डॉ.सुधाकर शिंदे महानगरपालिकेत आयुक्त म्हणून पुन्हा रु जू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. भाजपाचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचे भाऊ असल्याने निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांची बदली झाल्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली होती. निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या झालेल्या बदलीविरोधात रहिवासी, संघटनांनी पनवेलमध्ये रान उठविले होते. पनवेल महानगरपालिका संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी बदलीविरोधात मोर्चा देखील काढला होता. मात्र निवडणुकीनंतर शिंदे हे परत येतील, अशी माहिती राज्य शासनाने दिली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी २६ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉ. सुधाकर शिंदे यांना पुन्हा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. डॉ. सुधाकर शिंदे हे पुन्हा पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यास पालिकेचा कारभार पारदर्शक पार पडेल, अशी प्रतिक्रि या पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांनी दिली.
डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीविरोधात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांची आम्ही भेट घेतली होती. त्यांची नियुक्ती पालिकेवर झाल्यास हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याची प्रतिक्रि या पनवेल महानगर पालिका संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.
मला याबाबत काहीच कल्पना नाही. शासन ज्या ठिकाणी मला पाठवेल त्याठिकाणी जाऊन प्रामाणिक काम करेल हेच माझे ध्येय आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका