मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर
By नारायण जाधव | Updated: October 10, 2022 15:55 IST2022-10-10T15:54:57+5:302022-10-10T15:55:46+5:30
दोन शहरांतील अंतर येणार तीन तासांवर

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर
नवी मुंबई : अखेर बहुचर्चित ७११ किमीच्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून, तो एनएचआरसीएलला अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या बुलेट ट्रेनच्या कामास रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले
प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विक्रबाद आणि हैदराबादसह या ११ रेल्वेस्थानकांचा समावेश असणार आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग ठाणे जिल्ह्यातील ९ किमीचा असणार आहे. जिल्ह्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन जाणार आहे.
मुंबई आणि हैदराबाददरम्यानचा प्रवास करण्यासाठी १४ तास लागतात; परंतु जर बुलेट ट्रेन सुरू झाली, तर मुंबई ते हैदराबाद प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे या मार्गास देशाच्या रेल्वे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. कारण महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग मोलाचा ठरणार आहे.
विमानाद्वारे केले लिडार सर्वेक्षण
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ‘मुंबई-पुणे-हैदराबाद’ बुलेट ट्रेनसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सुरुवात झाली होती. त्यासाठी सर्वेक्षणाकरिता अत्याधुनिक ‘एरियल लिडार’ आणि ‘इमेजरी सेन्सर’ने बसवलेल्या विमानाने पाहणी करून ग्राउंड सर्वेक्षण केले होते.
ग्रीन कॉरिडॉरमुळे होताेय विरोध
या मार्गात ठाणे, पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या ग्रीन कॉरिडॉरमधील वन आणि शेतजमीन बाधित होणार आहे. यामुळे शेतकरी आणि पर्यावरणवाद्यांकडून त्यास आधीपासूनच विरोध होत आहे.
३५० किमीच्या वेगाने धावणार बुलेट ट्रेन
७११ किमीच्या या मार्गावर प्रतितास ३५० किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावेल, असा त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा वेग सरासरी २५० किमी प्रतितास असेल. रूळ स्टॅंडर्ड गेजचे असणार असून, एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे.