लॉजिंगच्या नावाखाली कोपरीत कुंटणखाना
By Admin | Updated: December 31, 2014 23:00 IST2014-12-31T23:00:20+5:302014-12-31T23:00:20+5:30
लॉजिंग आणि बोर्डींगच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या कोपरीतील लॉजच्या व्यवस्थापकासह चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.

लॉजिंगच्या नावाखाली कोपरीत कुंटणखाना
ठाणे : लॉजिंग आणि बोर्डींगच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या कोपरीतील लॉजच्या व्यवस्थापकासह चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.या कारवाईनंतर दहा महिलांची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्याच्या पूर्व भागातील कोपरी येथील ‘धनराज’ आणि ‘धनश्री’ या लॉजमध्ये लॉजिंग आणि बोर्डींगच्या नावाखाली महिलांकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याची तक्रार ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनाराण यांना मिळाली होती.या महिलांना लॉजच्या समोरच अंगविक्षेप करुन ग्राहकांना उद्दुक्त करण्यासाठीही लॉजच्या चालकांकडून दबाव आणला जात होता. रस्त्यावरच्या या प्रकारामुळे स्थानिक तसेच चाकरमानी महिलांची मात्र कुचंबणा होत होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख आणि उपनिरीक्षक शरद पंजे यांच्या पथकाने २९ डिसेंबर २०१४ रोजी रात्री ९.३० वा. च्या सुमारास या दोन्ही लॉजेसवर छापा टाकला. त्यावेळी दहा महिलांकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे लॉजचा व्यवस्थापक तुलसी रवा, चालक शंभु यादव (५२), कर्मचारी कुमार आचार्य आणि वेटर शनिचर यादव या चौघांना अटक करुन त्यांच्यावर पिटांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुटका केलेल्या महिलांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)