नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 07:11 IST2025-09-24T06:19:31+5:302025-09-24T07:11:21+5:30
२०२६ च्या मध्यापर्यंत, विमान उड्डाणांची संख्या जवळपास तीनपटीने वाढवून दररोज ५५ उड्डाणे करण्याचे नियोजन आहे

नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे औपचारिक उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया समूहाने विस्तार आराखडा जाहीर केला असून, यानुसार एअर इंडिया एक्स्प्रेसमार्फत सुरुवातीला दररोज २० उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे महामुंबईतील नागरिकांना नवी मुंबईतून देश-विदेशसाठी उड्डाण घेता येणार आहे. नंतरच्या टप्प्यात, म्हणजेच २०२६ च्या मध्यापर्यंत, विमान उड्डाणांची संख्या जवळपास तीनपटीने वाढवून दररोज ५५ उड्डाणे करण्याचे नियोजन आहे. त्यात पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. सन २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत एकूण ६० दैनिक उड्डाणे सुरू करण्याचे उद्दिष्ट समूहाने समोर ठेवले आहे.
९ कोटी प्रवासी क्षमता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची क्षमता निर्धारित केली गेली आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळ तब्बल ९० दशलक्ष म्हणजेच ९ कोटी प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्यास सक्षम असेल.
भारताच्या स्वप्नांना गती
अदानी एअरपोर्ट्ससोबतची भागीदारी जागतिक हवाई केंद्र होण्याच्या स्वप्नांना गती देईल, असा विश्वास एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी व्यक्त केला. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनीही या भागीदारीचे स्वागत केले.