कामोठेवासीयांची पाण्यासाठी वणवण

By Admin | Updated: March 17, 2016 02:31 IST2016-03-17T02:31:36+5:302016-03-17T02:31:36+5:30

कामोठेवासीयांना डिसेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रोज १६ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत असून, रहिवाशांनी या परिसरातून स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे.

Descriptive water for the Kamhodhya residents | कामोठेवासीयांची पाण्यासाठी वणवण

कामोठेवासीयांची पाण्यासाठी वणवण

- प्रशांत शेडगे,  पनवेल
कामोठेवासीयांना डिसेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रोज १६ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत असून, रहिवाशांनी या परिसरातून स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. सिडकोच्या नियोजनातील चुकांचा फटका हजारो नागरिकांना बसत असून, येथील अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.
शहराची शिल्पकार म्हणून सिडको प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. नवी मुंबई हे देशातील पहिले नियोजनबद्ध शहर वसविले व आता दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा संकल्प केला आहे. परंतु ज्या दिवशी स्मार्ट सिटीची घोषणा केली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामोठेवासीयांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली. डिसेंबरमध्येच नागरिकांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. पाणी प्रश्नाने पुन्हा एकदा सिडकोचे नियोजन चुकल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. वास्तविक या नोडचा विकास करताना तेथे भविष्यातील लोकसंख्या विचारात घेवून पाणीपुरवठ्याची सोय करणे अत्यंत आवश्यक होते. परंतु सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून पाणी घेवून ते या परिसराला पुरविण्यास सुरवात केली. दुसऱ्यावर अवलंबून असणारी पाणीपुरवठा यंत्रणा कधीही कोलमडू शकते याचाच प्रशासनास विसर पडला. पाणीटंचाईचे कारण सांगून महापालिकेने डिसेंबरमध्ये अचानक पाणीपुरवठा कमी केला असल्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे. गरजेपुरतेही पाणी मिळेनासे झाले आहे. पाणी कधी येईल याचा भरवसाही राहिला नाही. कामोठेपासून खांदेश्वर व मानसरोवर रेल्वे स्टेशन जवळ आहे. यामुळे भविष्याचा विचार करून नागरिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून येथे घरे घेतली आहेत. कामोठे, जुई या गावांच्या परिसरात येथील भूमिपुत्रांनी मोठी गुुंतवणूक करून व प्रसंगी कर्ज घेवून इमारती बांधल्या आहेत. घरे भाड्याने देणे हा परिसरातील प्रमुख व्यवसाय झाला आहे.
कामोठे परिसरात डिसेंबरमध्येच पाणी मिळेनासे झाल्याने नागरिकांनी घरे खाली करण्यास सुरवात केली आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या हजारो नागरिकांनी या परिसरातून स्थलांतर केले आहे. शेकडो इमारतींमधील अनेक सदनिका भाडेकरू मिळत नसल्याने मोकळ्या पडल्या आहेत. नागरिकांनी येथून स्थलांतर केल्यामुळे घर भाड्याने देणाऱ्यांचे नुकसान झाले आहेच, शिवाय इतर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. येथील आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी बोअरवेल मारून पाण्यासाठी पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जादा पैसे देवून टँकरने पाणी आणावे लागत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिडको-मनपा भांडणाचा परिणाम
सिडको प्रशासनाने ४ डिसेंबरला दक्षिण नवी मुंबई ही पहिली स्मार्ट सिटी बनविण्याची घोषणा केली. या कार्यक्रमात महापौरांना योग्य सन्मान दिला नाही.
सिडकोने अप्रत्यक्षपणे महापालिकेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे नोव्हेंबरपर्यंत कामोठे परिसराला रोज ३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेने डिसेंबरमध्ये तत्काळ २३ दशलक्ष लिटरवर प्रमाण आणले.

कामोठे परिसरात रोज ४० एमएलडी पाणी पुरवठ्याची गरज आहे. परंतू सद्यस्थितीमध्ये २२ ते २३ एमएलडी पाणीच उपलब्ध होत आहे.

अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आम्हाला मागणीप्रमाणे पाणी देता येत नाही. सद्यस्थितीमध्ये शहरात ४० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. पुढील काळात नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हेटवणे धरणातील पाणीही कामोठे नोडला देण्याचे विचाराधीन आहे.
- रमेश गिरी,
अधीक्षक अभियंता,
सिडको पाणीपुरवठा

यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने पाणीटंचाई सुरू आहे. पण कामोठेमधील रहिवाशांना वर्षभरच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल होवू लागले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- रेश्मा गायकर,
सेक्टर २०, कामोठे

सिडकोचा देशातील पहिली स्मार्ट सिटी बनविण्याचा आटापिटा पाहून त्यांची कीव कराविशी वाटत आहे. कामोठेमधील रहिवाशांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करून देणेही प्रशासनाला शक्य होत नाही. पहिले पाणी द्या नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा.
- तृप्ती सुर्वे,
गृहिणी

सिडकोने कामोठेमधील समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. पाऊस कमी पडल्याने पाण्याची टंचाई भासणार हे माहीत असूनही काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. यामुळेच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिडकोने फक्त वसाहत वसविण्याचे काम केले, नागरिकांच्या सुविधेचा विचारच केला नाही.
- अनुराधा जगताप, कामोठे

पाणी नसल्यामुळे रोजची काम करणं कठीण आहे. एक दिवसाआड आमच्या सोसायटीत पाणी येत असल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा होतो. पाणी कमी दाबाने येत असल्याने चौथ्या मजल्याच्या वर पाणी चढत नाही. त्यामुळे आमच्या सोसायटीत बोअरवेल घेण्यात आली आहे. कामोठ्यासाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नव्हती तर सिडकोने वसाहत का वसविली?
- संघमित्रा सरकटे, गृहिणी

कामोठ्यात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. नवीन पनवेल येथे पाणीटंचाई नाही, मग कामोठ्यातच का? सिडकोने यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
- अश्विनी फुं दे, गृहिणी

कामोठ्यात पाणी नसल्याने आम्ही दुसरीकडे भाड्याने घर घेण्याचा विचार करत आहोत. जे पाणी येत आहे, तेही चांगले येत नसल्याने बिसलरी पाणी मागवावे लागत आहे.
- विद्या जोशी, गृहिणी

Web Title: Descriptive water for the Kamhodhya residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.