पिण्याच्या पाण्यासाठी केंबुर्लीत वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 02:13 IST2016-03-12T02:13:57+5:302016-03-12T02:13:57+5:30
उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे

पिण्याच्या पाण्यासाठी केंबुर्लीत वणवण
दासगाव : उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे. अशीच टंचाई सध्या महाड शहरालगत असलेल्या केंबुर्ली गावात सुरू आहे. नदीला पाणी आहे, धरणात पाणी आहे, पण केवळ पाणी योजना जीर्ण झाली आणि त्यावर पैसा खर्ची टाकायचा नाही या शासनाच्या धोरणामुळे केंबुर्ली ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असून यामुळे नद्या, नाले आटू लागले आहेत. महाड तालुक्यात मार्च महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. आता याबाबत आराखडा तयार होवू लागला आहे. कोथुर्डे धरणातून पिण्याचे पाणी मिळते. गांधारी नदीतील जॅकवेलद्वारे पाणी उपसा करून केंबुर्ली गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ही योजना १७ वर्षे जुनी आहे. यामुळे या योजनेची दुरवस्था झाली आहे. योजना जुनी झाल्याने त्यावर दुरुस्तीसाठी निधी खर्ची टाकायचा नाही या शासकीय धोरणामुळे केंबुर्ली गावच्या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती रखडली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील रायगड जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कें बुर्ली ग्रामस्थांच्या समोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंबुर्ली गावात सुमारे १२०० लोकवस्ती असून मोहल्ला, बौद्धवाडी आणि इतर पाच वाड्या आहेत. केंबुर्ली ग्रामस्थ पावसाळ्याचे चार महिने ओढ्याचे पाणी वापरतात. तर नंतर नळ पाणीपुरवठा योजना आणि गावातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापर करतात. पिण्याच्या पाण्यासाठी गावात केवळ दोन विहिरी आहेत. पण या विहिरींना पाणी देखील पुरेसे नसल्याने नळ पाणीपुरवठा योजनेवरच केंबुर्ली ग्रामस्थांना सर्वस्वी अवलंबून राहावे लागते अशी परिस्थिती आहे. या विहिरी देखील एक किमी अंतरावर असल्याने सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.केंबुर्ली ग्रामस्थ दासगाव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन व्हॉल्ववरून टपकणारे पाणी भरताना दिसत आहेत. पाणीपुरवठा योजनेत बिघाड झाला तर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतो. शहर जवळ असल्याने रिक्षा, सायकल अगर दुचाकीवरून ग्रामस्थ पिण्याचे पाणी शहरातून आणतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात श्रम आणि वेळ वाया जातो. उन्हाळ्यात टंचाई काळात पंचायत समितीकडून पाण्याचा टँकर मिळत असला तरी आता पाण्याचे काय ? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा आहे.नांदगाव : मुरुड तालुक्यातील विहुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणारे विहुर धरण आटल्याने सर्व ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. विहुर धरणाच्या पिण्याच्या पाण्यावर सुमारे २५ हजार लोकांचे जीवन अवलंबून आहे. आताच पाण्याची टंचाई होत असल्याने एप्रिल, मे महिन्यात काय स्थिती राहील यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तेव्हा योग्य ते नियोजन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
> कर्जतमधील ३४ गावे, ४१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
कर्जत : तालुक्यात गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे यावर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला अनेक गावे-वाड्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही दिवसांनी टँकर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. आराखडा तयार करताना तालुक्यात गावपातळीवर सुरू असलेल्या नळपाणी योजनांची कामे, जलसंधारण अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा विचार केला. त्यानुसार तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांची नावे निश्चित करून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कळंब (गावठाण), कुंडलज, जांभीवली, अंत्राट वरेडी, बोरगाव, ओलमण, मूळगाव, खांडपे, कोंदिवडे, बीड, नेवाळी, लाडीवली, तिवणे (वासरे), दहीगाव, वरई, आडीवली, आर्ढे, पाली गाव, आंबोट, पोटल, किरवली, सालपे, कडाव, सावळा, हेदवली, गुडवण, किकवी, आषाणे, कोषाणे, मोग्रज, माणगाव (खांडपे), पोसरी, तिवरे यांचा सामावेश आहे. तर वाड्यांमध्ये टाकाची वाडी-दामत, खांडसवाडी, वेणगाव कातकरवाडी, भडवळ कातकरवाडी, डोणेवाडी, नवसूची वाडी, जांभूळवाडी (वारे), हाऱ्याची वाडी आदींचा सामावेश आहे.