सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:35 IST2025-12-13T18:22:19+5:302025-12-13T18:35:12+5:30
सिडकोच्या १७ हजार घरांच्या किमतीत १० टक्के कपात करणार असल्याने सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त

सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Eknath Shinde decision on CIDCO home : नवी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. नवी मुंबईतील सिडको वसाहतींमधील विविध प्रवर्गातील घरांच्या निश्चित दरांमध्ये राज्य सरकारने थेट १० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधान परिषदेत निवेदन सादर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे सिडकोची घरे आता पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सहजपणे पूर्ण होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
७ हजार घरांसाठी लॉटरीपूर्वी दरकपात
सिडकोने नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल यांसारख्या प्रमुख परिसरात तब्बल १७ हजार घरे बांधली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट या प्रवर्गातील घरांच्या किमतीत १० टक्क्यांनी कपात होणार आहे.
'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेला बळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहे.
सिडकोच्या घरांच्या किमती बाजारभावापेक्षा जास्त असल्याने त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे सिडकोच्या लॉटरीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी सातत्याने या किमती कमी करण्याची मागणी केली होती. अनेक बैठकांनंतर आता सरकारने ही मागणी मान्य करत मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठीही मोठे पाऊल
या घोषणेव्यतिरिक्त, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी उचललेल्या एका मोठ्या पावलाची माहितीही दिली. मुंबईत ५० एकरपेक्षा जास्त भूखंडावर पुनर्विकास योजना राबवण्यात येणार आहे. या पुनर्विकास योजनांमध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जातील. मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाई नगरसह १७ ठिकाणी ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. एकंदरीत, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नवी मुंबई आणि मुंबई परिसरात स्वतःच्या घराच्या शोधात असलेल्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.