मिनीबस माथेरानमध्ये आणण्याची मागणी
By Admin | Updated: May 30, 2017 06:26 IST2017-05-30T06:26:11+5:302017-05-30T06:26:11+5:30
मागील नऊ वर्षांपासून कर्जत-माथेरान दरम्यान मिनीबस सेवा सुरू झाल्यामुळे आज अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत

मिनीबस माथेरानमध्ये आणण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : मागील नऊ वर्षांपासून कर्जत-माथेरान दरम्यान मिनीबस सेवा सुरू झाल्यामुळे आज अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. तर स्थानिक अन् व्यावसायिकसुद्धा याच स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिकोनातून मिनीबसचा सातत्याने वापर करताना दिसत आहेत. मात्र, पहाटे महाविद्यालयीन शिक्षणासाठी काळोखातून मुलींना पायी तीन कि. मी दस्तुरीपर्यंत बस पकडण्यासाठी जावे लागत आहे. यामुळे केवळ मुलींचा विचार करूनबाजारपेठेपर्यंत पहाटेची एक बस आणण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
मिनीबस सेवेमुळे येथील उद्योग, वाहतुकीला आणि शैक्षणिक क्र ांती घडण्यात याच मिनीबसचा मोलाचा वाटा आहे. दिवसाला या बसच्या ये-जा करून एकूण दहा फेऱ्या होत आहेत. त्यामुळे या सेवेच्याच माध्यमांतून कर्जत आगारालाही भरीव उत्पन्न मिळत आहे.
नियमितपणे नेरळ-कर्जत वा अन्य भागांत महाविद्यालयात जाणाऱ्या जवळपास २५ ते ३० मुला-मुलींना सकाळीच महाविद्यालयात जाण्यासाठी पहाटे ४ ते ५ वाजता उठून तयार व्हावे लागत असून, दस्तुरीपर्यंतचे पायी तीन किलोमीटरचे अंतर प्रवास करताना दाट काळोखातून मार्गक्र मण करताना विशेषत: मुलींना त्रासदायक ठरत आहे. ६.१५ वाजता सुटणारी ही बस पकडण्यासाठी वेळप्रसंगी धावपळ करावी लागत आहे. कधी-कधी मुली सोबत नसल्यास एकट्याच या सुनसान मार्गावरून पायी प्रवास करीत असतात. सध्या सर्वत्रच मुलींची छेडछाड, तसेच बलात्काराची प्रकरणे ऐकावयास मिळत आहेत. पहाटे मुलांचे पालक जेमतेम अर्ध्या वाटेपर्यंत सोडण्यास जात असतात. या सर्व बाबींचा विचार करून फक्त शालेय विद्यार्थ्यांना नेरळपर्यंत मिनीबसची सोय होण्यासाठी ही मिनीबस फक्त पहाटेच्या वेळेसच एक फेरी बाजारपेठेच्या श्रीराम चौक येथे आणावी अशी मागणी होत आहे.