नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:33 IST2019-07-10T23:33:25+5:302019-07-10T23:33:29+5:30
खारघरमधील पूरपरिस्थिती : तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी; रखडलेल्या कामाविषयी नाराजी

नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघर शहरातील पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहून नेणारा मुख्य नाला कोपरा या ठिकाणी फुटल्याने शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. या नाल्याचे पाणी सायन-पनवेल महामार्गावर आले होते. सुमारे तीन तास येथील वाहतुकीवर या घटनेचा परिणाम झाल्याने अनेकांना याचा फटका बसला. या घटनेला सिडकोचे ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याने मंगळवारी खारघर शहरातील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सिडकोच्या मुख्य अभियंत्याची भेट घेतली.
खारघर शहरातील जो नाला फुटला, त्या नाल्याच्या प्रवाह बदलाचे काम मागील वर्षाभरापासून रखडले आहे. याकरिता सिडकोने नव्याने पूल व नाल्याचा प्रवाहाचे काम हाती घेतले आहे. मात्र, या ठिकाणाहून जाणारी नवी मुंबई महानगरपालिकेची जलवाहिनी व काही पेट्रोलियम कंपन्यांच्या वाहिन्या भूमिगत करण्याची गरज आहे. सिडको प्रशासन व अन्य प्राधिकरणाच्या समन्वयाच्या अभावामुळे या वाहिन्या भूमिगत होऊ शकल्या नाहीत. मात्र, या उदासीन कारभाराचा मोठा फटका खारघरवासीयांना भेडसावू शकतो, हे सोमवारच्या घटनेने सिद्ध झाले आहे. या संदर्भात जाब विचारण्यासाठी खारघर शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी सिडकोचे मुख्य अभियंता के. के. वरखेडकर यांची सिडको भवनात भेट घेतली. या बैठकीत मुख्य नाल्याचे प्रवाह बदलण्याचे, रखडलेल्या कामाची माहिती मुख्य अभियंत्यांकडून घेण्यात आली. या वेळी वरखेडकर यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या ठिकाणी सतत एक टीम कार्यरत राहणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली. तसेच रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत शहराला भेडसावणारा दहा एमएलडी पाण्याचा तुटवडा, शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजण्याची मागणी करण्यात आली. सर्व कामे त्वरित हाती घेण्यात येतील, असेही या वेळी वरखेडकरांनी स्पष्ट केले. नगरसेवकांच्या शिष्टमंडळात प्रभाग ‘अ’ सभापती शत्रुघ्न काकडे, महिला बाल कल्याण सभापती लीना गरड, ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, नगरसेविका आरती नवघरे, बीना गोगरी आदीसह सिडकोचे विविध विभागातील अभियंते उपस्थित होते.