सुधागडावर महादरवाजाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:00 IST2020-02-20T23:59:52+5:302020-02-21T00:00:05+5:30
‘बा रायगड परिवार’चा उपक्रम : श्रमदानातून गडाला मिळाले गतवैभव

सुधागडावर महादरवाजाचे लोकार्पण
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील सुधागडला श्रमदानातून गतवैभव मिळवून देण्याचे काम ‘बा रायगड परिवार’च्या माध्यमातून सुरू आहे. गडावरील मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर लोकसहभागातून महादरवाजा तयार करण्यात आला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्याचे लोकार्पण करण्यात आले.
देशातील प्राचीन किल्ल्यांमध्ये समावेश होणाऱ्या सुधागड किल्ल्यावर बा रायगड परिवाराचे सदस्य काही वर्षांपासून संवर्धनाचे काम करीत आहेत. गडावरील महादेव मंदिर व गजलक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून महादरवाजा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी लागणारे साहित्य दोन तास डोंगर चढून गडावर नेण्यात आले. शिवजयंतीला या दरवाजाचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी शहीद दीपक घाडगे यांचे कुटुंबीय, सरदार नेताजी पालकर यांचे वंशज अशोक पालकर, सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांचे वंशज, ज्येष्ठ गिर्यारोहक प्रदीप केळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
बा रायगड परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी गडावर शिवजयंती साजरी केली जाते. रात्री महादरवाजा ते पंत सचिवाचा वाड्यापर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास जवळपास दीड हजार शिवप्रेमी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने गडावर सातत्याने दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून महादरवाजा बनविण्यात आला आहे. संवर्धनाच्या कामातील एक टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद होत असल्याचे मत संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केले.