लुटारूंच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू , गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:04 IST2017-12-09T02:04:15+5:302017-12-09T02:04:25+5:30
सातारा येथून सत्संगाला जाण्यासाठी मुंबईत आलेल्या हनुमंत सर्जेराव वरेकर याला १५ नोव्हेंबरला जुईनगर स्टेशनबाहेर लुटारूंनी लुटून मारहाण केली.

लुटारूंच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू , गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; दागिने पळविले
नवी मुंबई : सातारा येथून सत्संगाला जाण्यासाठी मुंबईत आलेल्या हनुमंत सर्जेराव वरेकर याला १५ नोव्हेंबरला जुईनगर स्टेशनबाहेर लुटारूंनी लुटून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या वरेकर यांचा तीन दिवसांनंतर रुग्णालयातच मृत्यू झाला. या घटनेला एक महिना होत आल्यानंतरही अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील वर्धनगड येथे राहणारे हनुमंत सर्जेराव वरेकर हे दिल्लीमधील संत निरंकारी मिशनच्या सत्संगाला जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरले. तेथून रेल्वेने ते मानखुर्द येथे राहणारे त्यांचे पुतणे राजेंद्र बबन वरेकर यांच्याकडे जाणार होते. रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांना लुटारूंनी अडविले व बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील ८० हजार रुपये रोख रक्कम, दोन अंगठ्या, १ चेन, मोबाइल, घड्याळ, पाकीट व कागदपत्र हिसकावून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या वरेकर यांना अज्ञात व्यक्तीने वाशीतील महापालिका रुग्णालयामध्ये भरती केले. नातेवाइकांनी त्यांना रात्री १ वाजता वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. दुसºया दिवशी सायंकाळी त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. १८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे, परंतु पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. यामुळे नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली आहे.