नेव्हीत रुजू होण्यापूर्वीच तरुणाला मृत्यूने गाठले
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 8, 2024 17:56 IST2024-05-08T17:55:45+5:302024-05-08T17:56:43+5:30
उलवे येथे राहणाऱ्या समर्थ कराळे (१९) याचा नेरुळ येथे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

नेव्हीत रुजू होण्यापूर्वीच तरुणाला मृत्यूने गाठले
नवी मुंबई : एक महिन्यांनी नेव्हीत भरती होणार असलेल्या तरुणाचे अपघाती निधन झाले आहे. उलवेत राहणारा हा तरुण मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्याचा अपघात झाला. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
उलवे येथे राहणाऱ्या समर्थ कराळे (१९) याचा नेरुळ येथे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्याने नुकतेच मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून एक महिन्यांनी तो कामावर रुजू होणार होता. दरम्यान मंगळवारी रात्री तो मित्रांसह दुचाकीवरून बाहेर गेला होता. यानंतर मध्यरात्री दोन वाजता त्याने मॅसेज करून घरी येत असल्याचे सांगितले होते. परंतु पहाटे चार च्या सुमारास तो नेरुळ येथे ठाणे बेलापूर मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
उलवे येथे तो आईसह रहायला होता. तर घरची परिस्थिती बेताची असल्याने तो खासगी ठिकाणी नोकरी देखील करायचा. परिस्थितीवर मात करून तो मर्चंट नेव्हीत भरती झाला होता. मात्र कामावर रुजू होण्याच्या एक महिना अगोदरच त्याला मृत्यूने गाठले. त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपघातावेळी तो एकटाच त्याठिकाणी होता का ? त्याच्या सोबतचे मित्र कुठे होते ? याचाही अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहेत.