एपीएमसी पसरवतेय डेंग्यू, मलेरियाची साथ
By Admin | Updated: July 17, 2017 01:34 IST2017-07-17T01:34:30+5:302017-07-17T01:34:30+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतींचे बांधकाम करणाऱ्या

एपीएमसी पसरवतेय डेंग्यू, मलेरियाची साथ
नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी योग्य काळजी घेतलेली नाही. व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर ठेवलेल्या साहित्यामध्येही पाणी साचत असून, यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने एपीएमसीला व येथील प्रशासनाने व्यापाऱ्यांसह ठेकेदारांना नोटीस पाठविण्यात सुरवात केली आहे.
नवी मुंबईमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागल्याने महापालिका प्रशासनाने शहरभर जनजागृती सुरू केली आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन संबंधितांना नोटीस दिल्या जात आहेत. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही तर कारवाईचा इशाराही दिला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले. फळ मार्केटमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
इमारतीच्या छतावर व बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मार्केटमधून जप्त केलेल्या हातगाड्या याच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. गटारांचे काम पूर्ण झाले नसल्याने सर्व पाणी एकाच ठिकाणी साचून रहात आहे. याशिवाय भाजी व फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर मोकळे क्रेट्स ठेवले आहेत. गाळ्यांवर अनधिकृतपणे पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून त्या टाक्यांची साफसफाई केली जात नाही. पाणी साचून रहात असल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. याशिवाय मार्केटमध्ये कँटीन व इतर खाद्यपदार्थ विक्रेते त्यांच्याकडील शिल्लक खाद्यपदार्थ गटारामध्ये टाकत असून सर्व गटारांमध्ये गाळ साचला आहे. जागोजागी पाणी साचत असल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत.
भाजी मार्केटला लागून व कृषी प्लाझाच्या मागील बाजूलाही एपीएमसीने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने पालिकेच्या जलउदंचन केंद्राच्या बाजूला मोठा खड्डा तयार केला आहे. या खड्ड्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
याशिवाय बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. विस्तारित भाजी मार्केट व फळ मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे परप्रांतीय कामगार वास्तव्य करत आहेत. या कामगारांमुळेही मार्केटमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढत असून साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने नोटीस पाठविल्यानंतर बाजार समिती प्रशासनानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सर्व मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी व ठेकेदारांना बाजार समिती प्रशासन स्वत: नोटीस बजावत आहे. मार्केट स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला असून दोन दिवसांपासून नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.