ऐरोली-घणसोली खाडीपुलामुळे ६६०० खारफुटीस हानी, 1 हजार खारफुटीची कायमची कत्तल
By नारायण जाधव | Updated: December 13, 2022 20:46 IST2022-12-13T20:46:09+5:302022-12-13T20:46:34+5:30
पूल झाल्यानंतर वाहतूक होणार सुसाट

ऐरोली-घणसोली खाडीपुलामुळे ६६०० खारफुटीस हानी, 1 हजार खारफुटीची कायमची कत्तल
नवी मुंबई:नवी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या घणसोली-ऐरोली दरम्यानच्या सहा पदरी उन्नत पुलाच्या कामासाठी साडेपाच हजार ते सहा हजार खारफुटीला क्षती पोहचणार असून यात एक हजार खारफुटीची तर कायमची तोडावी लागणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या पुलाच्या साईटचा पाहणी दौरा करून अधिकाऱ्याना तो बांधण्यासाठी ज्या ज्या परवानग्या लागणार आहेत, त्या तत्काळ घेण्यास सांगून या कामास वेग देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुमारे १९५० मीटर लांबीच्या या खाडीपुलासाठी चार हेक्टर वनजमीन बाधित होणार आहे. पूल आणि कनेक्टिंग रस्ते असे साडेतीन किलाेमीटरचे काम यात केले जाणार आहे. हा पूल पुढे मुलुंड-ऐरोली खाडीपुलासह ऐरोली-काटई रस्त्याला जोडण्यात येणार आहे. पुलासाठी २५ पिलर टाकण्यात येणार आहेत. मँग्रोव्ह सेलने २०२१ मध्ये सादर केलेल्या रिपोर्टनुसार हा पूल दिवे, तळवली, घणसोली येथील १२,१५० चौरस मीटर वनजमिनीतून जाणार आहे.
पुलाची गरज का
सध्या नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर रोड आणि पाम बीच रोड हे दोनच रस्ते मुंबई-ठाण्याला नवी मुंबई शहरासह येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदरास जोडतात. यामुळे सध्या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा ताण पडत आहे. एकात्मिक बांधकाम नियमावलीमुळे सध्याच्या एक ते दीड चटईक्षेत्रावर बिल्डरांना चार ते पाच चटईक्षेत्रापर्यंत बांधकाम करता येणार आहे. शिवाय ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील आयटी कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. शिवाय मुलुंड-ऐरोली खाडीपुलास नवी मुंबईतील अंतर्गत भागातून वाशी-खाडीपुलास जोडण्यासाठी घणसोली-ऐरोली खाडीपूल उपयुक्त ठरणार आहे. कारण पीक अवरमध्ये हा पूल झाल्यावर ५७६६ वाहनांची दर तासाला वर्दळ वाढेल, असा अंदाज महापालिकेने वर्तविला आहे. तसेच त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीच्या वेळात दहा मिनिटांची बचत होणार आहे. सध्या ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जे अंतर कापण्यासाठी १६ मिनिटे लागतात ते पाच ते सहा मिनिटांवर येणार आहे.
इको सेन्सिटिव्ह व वनविभागाचा अडसर दूर
हा पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर आता वनविभाग आणि इको सेन्सिटिव्हची परवानगी मिळाली आहे. यामुळे मोठा अडसर दूर झाला असून आता लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून पुलाची निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
फ्लेमिंगोंना हानी नाही
फ्लेमिंगोंना हानी पोहचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. पुलाच्या आजूबाजूला फ्लेमिंगों पार्क विकसित करण्यात येणार आहे. शिवाय पादचार्यांसाठी वॉक वे ठेवण्यात येणार आहे.
पालघरमध्ये पर्यायी खारफुटीची लागवड
वनमंत्रालय आणि सीआरझेडच्या नियमानुसार एखाद्या प्रकल्पात बाधित होणाऱ्या खारफुटीच्या पाच पट खारफुटीची लागवड इतरत्र करणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यात पर्यायी जागा मिळाली आहे.
संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका